घरीच कचरा वेगळा करून वेचकांना द्यावा!
By Admin | Published: April 15, 2017 12:34 AM2017-04-15T00:34:55+5:302017-04-15T00:34:55+5:30
निसर्गातून आपण जे घेतो ते निसर्गाला योग्य पद्धतीने परत केल्यास समस्या निर्माण होणार नाही.
शरद काळे : शून्य कचरा व्यवस्थापन विभागीय जाणीव जागृती कार्यशाळा
वर्धा : निसर्गातून आपण जे घेतो ते निसर्गाला योग्य पद्धतीने परत केल्यास समस्या निर्माण होणार नाही. मात्र तसे न करता नागरिक म्हणून आपली जबाबदारी सहजपणे ढकलतो. राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्याला प्रतिज्ञा का घ्यावी लागते. ते दैनंदिन व्यवहारातून व्यक्त व्हायला पाहिजे. माझा घरचा कचरा बाहेर जाणार नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावावी म्हणून ओल्या कचऱ्याची खतनिर्मिती व सुका कचरा वेगळा करून कचरा वेचकांना द्या, असे आवाहन भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबईचे निवृत्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांनी केले.
स्त्रीमुक्ती संघटना मुंबई, आचार्य श्रीमन्नारायण पॉलिटेक्निक, पिपरी आणि ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शून्य कचरा व्यवस्थापन विभागीय जाणीव जागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेचे प्रास्ताविक स्त्री मुक्ती संघटनेच्या अध्यक्ष ज्योती म्हापसेकर यांनी केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी विचार परिषदेचे भरत महोदय होते.
वर्धा नगरपरिषदेने घेतलेल्या पुढाकाराची सविस्तर माहिती तराळे यांनी दिली. कचऱ्याची समस्या हाताळाण्यासाठी लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यानंतर निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी वृक्ष संवर्धनासह घरोघरी कचरा खत व्यवस्थापन करण्याचे सांगितले.
दुपारच्या सत्रात बुलढाण्यातील कचरा वेचकांबरोबरच्या कामांचे अनुभव प्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ. इंदू लहाने यांनी सांगितले. तर मुंबई कचरा वेचक संघटनेच्या अध्यक्ष सुशिला साबळे यांनी दुष्काळी भागातून आईसोबत लहानपणी मुंबईला स्थलांतर आणि कचरा वेचण्याच्या कामापासून सुरूवात करून स्त्री मुुक्ती संघटनेबरोबर कार्य करणे, प्रशिक्षण आणि व्यवस्थापनाचे तंत्र शिकण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले. हा प्रवास प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी उमटल्या. आंतरराष्ट्रीय परिषदेत कचरा वेचकांचे प्रश्न मांडल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी वर्धा शहरातील वडरवस्ती आणि बोरगाव (मेघे) येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या ३८ कचरा वेचक महिलांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. यावेळी महिलांनी आपल्या कौटुंबिक अडचणी, कामाचा त्रास, लहान मुलांची होणारी आबाळ कथन केली. शहरी भागात आम्ही कचरा वेचून सफाई करतो. पण लोक आम्हाला आमच्या आयुष्याला कचऱ्या समान लेखतात, असे सांगितले.
कचरा वेचक महिलांचे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न हाताळण्यासाठी संघटनेमार्फत सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन माविमच्या जिल्हा समन्वयक दरोकार यांनी दिले. तर नगर परिषद वर्धाचे निवृत्त आरोग्य अधिकारी टप्पे यांनी नियमाप्रमाणे न.प.च्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. वडर वस्तीमधील मुलांच्या शिक्षणासाठी आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम यांच्याकडून सहकार्य करण्यात येईल, असे संचालक सुषमा शर्मा यांनी सांगितले. यानंतर कार्यशाळेत झालेल्या विविध विषयावरील सत्रात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
उपस्थितांचे स्वागत ग्रामोपयोगी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सोहम पंड्या यांनी केले. संचालन प्रा. आशिष चव्हाण यांनी केले. जाणीव जागृती कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आरती प्रांजळे घुसे, निलेश आंबोरे, नयना पाटील, रेखा बोरकर, सारीका सहारे यांनी सहकार्य केले. पाच जिल्ह्यातील ३३ संस्थेतर्फे ८६ पुरूष आणि ११० महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)