३० क्विंटल कापसासह घरातील साहित्य खाक
By admin | Published: January 3, 2017 12:54 AM2017-01-03T00:54:56+5:302017-01-03T00:54:56+5:30
ब्राह्मणवाडा येथे सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक लागलेल्या आगीत दोन घरांतील साहित्यांसह घरात
ब्राह्मणवाडा येथील घटना : आग विझल्यावर आला अग्निशमन बंब
आकोली : ब्राह्मणवाडा येथे सोमवारी दुपारी ३ वाजता अचानक लागलेल्या आगीत दोन घरांतील साहित्यांसह घरात असलेला ३० क्विंटल कापूसही आगीच्या भक्षस्थानी आला. ज्या दोन घरांना आग लागली त्या घरातील नागरिकांच्या अंगावरील कपड्याव्यतिरिक्त काहीच उरले नाही. ग्रामस्थांनी शर्र्थीचे प्रयत्न करून आग विझवली; पण तोपर्यंत साहित्याचा कोळसा झाला होता. आग लागली त्यावेळी अग्नीशमन यंत्राला कल्पना देण्यात आली; मात्र सदर वाहन आग विझविल्यानंतर दाखल झाले. आगीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
येथील वेणुबाई काळे यांच्या घरात आगीने भडका घेतला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करीत बाजूच्या शंकर राजेराम काळे यांच्या घरालाही कवेत घेतले. यात दोन्ही घरांची राख रांगोळी झाली. वेणुबाई यांच्या घरी ठेवलेला २० क्विंटल कापूस तर शंकर काळे यांच्या घरातील १० क्विंटल असा एकूण ३० कापूस आगीच भक्ष्यस्थानी पडला. घरातल टिव्ही, फ्रिज, दिवाण या वस्तूंसह दैनंदिन वापरातील भांडी अन्नधान्य, कपडे जळून खाक झाले. घरातील मंडळीच्या अंगावरचे कपडेच शिल्लक राहिले. ग्रामस्थांनी आग विझविली. मात्र तोपर्यंत दोनही घरांचा कोळसा झाला होता. हे दोन्ही कुटुंब उघड्यावर पडले असून शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तलाठी के.सी. मेश्राम यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. (वार्ताहर)
चालत्या ट्रॅक्टरला आग
४चिकणी (जामणी) - ऊसाचा पाला भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला सोमवारी सकाळी आग लागली. हा ट्रॅक्टर ऊसाचा पाला घेऊन चिकणी-वर्धा मार्गाने जात होता. चिकणी गावाजवळ भाष्कर काकडे यांच्या शेतात वाकलेल्या पोलवर असलेल्या वीज तारांचा स्पर्श या ट्रॅक्टरला झाला. यातूनच ठिणगी पडल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आग लागली. याची माहिती रस्त्याने जात असलेल्या गावकऱ्यांना होताच त्यांनी ही माहिती काकडे यांना दिली. यावेळी शेतात असलेल्या पाण्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. आग विझविण्याकरिता शेख सिकंदर, पोमा डायरे, नौशाद शेख, अमोल पारोदे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच ट्रॅक्टर चालक मंगेश राऊत रा. पडेगाव, मालक राजु दहाघाने, पडेगाव यांनी सुध्दा सतर्कतेने ट्रॅक्टरचा समोर चा भाग काढून घेतल्याने अनर्थ टळला.(वार्ताहर)
तलाठी अहवाल प्राप्त होताच त्या दोन्ही कुटुंबांना तातडीने मदत केली जाईल.
- विलास कातोरे, नायब तहसीलदार, कारंजा (घा.)