गरिबांना घरकुलाची आशा; नवं घर यावर्षी तरी पूर्ण होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:01 IST2024-12-24T17:59:04+5:302024-12-24T18:01:17+5:30
सात हजार घरकुलांना मंजुरी : मोजकीच घरे पूर्ण, अनुदानाची प्रतीक्षा

Hope for a house for the poor; Will the new house be completed this year?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात २०२४-२५ वर्षात 'पीएमएवाय' अंतर्गत मंजूर घरकुलांपैकी ५ हजार लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला; तर २ हजार १० लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे घरकुलांची बांधकामे रखडली आहेत. शासन अनुदान कधी देणार, असा सवाल लाभार्थ्यांतून केला जात आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. मंजुरीनंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळाल्याने बांधकामे गतीने सुरू झाली. दुसरा आणि तिसऱ्या हप्त्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. निवडणूक आचारसंहिता काळात अनुदानाला थांबा देण्यात आला होता. अनेकांनी उसनवार करून घराची कामे सुरू ठेवली आहेत. मात्र, अनुदान न मिळाल्याने आता लाभार्थ्यांची कोंडी होत आहे. अनुदान कधी येणार? याची निश्चिती नाही. पण, संबंधित विभागात आश्वासन देत वेळ मारून नेण्यात येत आहे. घरकुलांच्या बांधकामासाठी उपलब्धतेनुसार अनुदान वितरीत केले जात आहे. या बांधकामासाठी रकमेचा व लागणाऱ्या साहित्याचा विचार केल्यास हे घरकुल बांधणे अवघड झाले आहे. सिमेंट, लोखंड, वाळूचे दर गगनाला भिडल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत.
६,९८८ घरे अपूर्ण
चालू आर्थिक वर्षात जिल्ह्याला साडेसात हजार घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, गत आठ महिन्यात केवळ २८ घरे पूर्ण झाली आहेत. ६ हजार ९८८ घरे अपूर्ण आहेत. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी असला तरी वेळेत ही घरे पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोणत्या तालुक्यात किती घरकूल मंजूर?
तालुका मंजूर घरे
आर्वी ९७७
आष्टी ६३८
देवळी १,०२६
हिंगणघाट १,३०२
कारंजा ७२२
समुद्रपूर ९९६
सेलू ७६१
वर्धा ५९४
५ हजार लाभार्थ्यांना मिळाला पहिला हप्ता
या योजनेअंतर्गत पात्र ५ हजार ६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे, तर दुसरा हप्ता १८८, तर तिसरा हप्ता केवळ ५७ जणांना देण्यात आला आहे.
जिल्ह्यात ७ हजार ६२३ घरकुलांना मान्यता
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२४-२५ साठी ७ हजार ६२३ घटकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ७ हजार १६ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.