शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्याची आशा

By admin | Published: May 9, 2016 02:03 AM2016-05-09T02:03:22+5:302016-05-09T02:03:22+5:30

येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगच्या मालकाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये गत दोन वर्षांपासून थकविले आहे.

The hope of getting the cotton punch for the farmers | शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्याची आशा

शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्याची आशा

Next

कापूस चुकारे प्रकरण : एपीएमसीला कर्ज
सेलू : येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगच्या मालकाने शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या कापसाचे सुमारे आठ कोटी रुपये गत दोन वर्षांपासून थकविले आहे. त्याविरूद्ध शेतकऱ्यानी विविध ठिकाणी आंदोलने करीत ही रक्कम कृषी सिंदी (रेल्वे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने द्यावी, अशी मागणी केली होती. यावर बाजार समितीच्यावतीने राज्याच्या पणन विभागाला बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला पणन मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे थकलेले चुकारे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार सेलू अंतर्गत श्रीकृष्ण जिनींग प्रेसींग कापसाची खरेदी करीत आहेत. या जिनिंगचा मालक सुनील टालाटुले याने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून त्यांचे आठ कोटी रुपयांचे चुकारे थकविले. याविरूद्ध शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर टालाटुलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांनी थकीत चुकाऱ्याकरिता नागपूर पासून दिल्लीपर्यंत आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर शासनाने टालाटुलेच्या जिनींगचा व शेतजमिनीचा लिलाव जाहीर केला. हा लिलाव होण्याच्या दिवशीच टालाटुले याने न्यायालयातून स्थगनादेश मिळविला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सेलूच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ठिय्या आंदोलन केले. यावेळी आमचे आठ कोटी बाजार समितीने शासनाकडून कर्ज घेऊन चुकते करावे, अशी मागणी केली. त्यासाठी तातडीने ठराव घेण्यास दबावही आणला. बाजार समितीने आठ कोटी रुपयांचे कर्ज बिनव्याजी शासनाने द्यावे व टालाटुलेची संपत्ती विकून ते परत घ्यावे, असा ठराव पारित करून तो शासनाकडे सादर केला.
या ठरावाचा संदर्भ घेत व शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेवून राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई स्थित सह्याद्रीवर शेतकरी प्रतिनिधी, बाजार समिती सभापती व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून चर्चा केली. त्यात बाजार समितीने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असा सूर मंत्र्यानीही आवळला; मात्र सभापती विद्याधर वानखेडे यांनी बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने बिनव्याजी कर्ज द्यावे व टालाटुलेची संपत्ती विकून त्याची परतफेड करावी, या ठरावाचा आधार घेत बाजार समितीला कर्ज मंजूर करण्याची मागणी लावून धरली. टालाटुलेची संपत्ती विकून जर कर्ज वसूल केल्या जात नसेल तर बाजार समिती ते कर्ज भरणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

पणनमंत्र्यांची सहमती
मुंबई येथे कापूस चुकाऱ्याच्या थकबाकी प्रकरणात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ व बाजार समितीची पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. यावर सकारात्मक तोडगा काढत बाजार समितीला शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी आठ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याच्या मागणीवर ना. चंद्रकांत पाटील यांनी शिक्का मोर्तब केले. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. या बैठकीला राज्याचे वित्तमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती होती.

पणनमंत्र्याशी मुंबईस्थित सह्याद्रीवर चर्चा झाली. बाजार समितीला आठ कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची चर्चेअंती पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तयारी दर्शविली. बाजार समितीला ही रक्कम प्राप्त होताच शेतकऱ्यांना देण्यात येईल. श्रीकृष्ण जिनिंगचे मालक टालाटुले यांच्याकडून त्या रक्कमेची वसूली शासनाने करून बिनव्याजी घेतलेले कर्ज भरायचे आहे. सद्या शेतकऱ्यांचे चुकारे मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.
- विद्याधर वानखेडे, सभापती, कृउबा समिती, सिंदी (रेल्वे).

Web Title: The hope of getting the cotton punch for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.