नागरिक वाघाच्या दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:48 PM2018-10-30T23:48:41+5:302018-10-30T23:49:43+5:30
तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : तालुक्यातील अनेक गांवामध्ये सध्या वाघाची दहशत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी उमरी या गावात शेतकऱ्यांना कपाशीच्या शेतात अडीच ते तीन फुट उंच वाघ अवघ्या २०० मीटर अंतरावरून दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे.
ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्याघ्र दर्शन झाले तेथून उमरी हे गाव अवघ्या ६०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील शालेय विद्यार्थी वाघाच्या दहशतीमुळे शाळेत जाण्यास नकार देत आहेत. उमरी येथील जि.प. शाळा व सोहमनाथ विद्या मंदिर हे गावाबाहेर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना आणि शाळेतील शिक्षकांना मुख्याध्यापकांनी मार्गदर्शनात्मक सूचना दिल्या आहेत. यापूर्वी सोमवारी खैरी, कारंजा जुनी, दुग्ध डेअरी परिसरात काहींनी वाघाला बघितल्याचे सांगितले जाते. तर दोन दिवसांपूर्वी लिंगा या गावातील चार गार्इंवर वाघाने हल्ला केला होता. तर एका गायीचा फडशा पाडला. शिवाय तालुक्यातील परसोडी, काकडा, जसापूर, नरसिंगपूर या भागात काहींना व्याघ्र दर्शन झाल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. याशिवाय जंगलव्याप्त कन्नमवारग्राम, आजनडोह, ढगा, बांगडापूर, रहाटी, काजळी, सिंदीविहिरी, सुंसंद, सहेली, मासोद या परिसरात यापूर्वीच वाघाची दहशत पसरविली होती. आता याच वाघाने आपला मोर्चा गाव शिवरांकडे वळविल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यातील काही गाव वाघाच्या दहशतीत असले तरी भटकंती करणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाºयांना अद्यापही व्याघ्र दर्शन झाले नसल्याचे सांगण्यात येते.