पालिकेच्या अर्धवट सभागृहात घोड्यांचा तबेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:18 AM2017-08-11T01:18:09+5:302017-08-11T01:19:25+5:30
ठाकरे मार्केट परिसरात पालिकेच्या अर्धवट बांधकामामुळे या भागातील व्यावसायिकांकडून नागरिकांना अनेक समस्यांचा समस्या करावा लागत असताना आता येथे घोडे बांधण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ठाकरे मार्केट परिसरात पालिकेच्या अर्धवट बांधकामामुळे या भागातील व्यावसायिकांकडून नागरिकांना अनेक समस्यांचा समस्या करावा लागत असताना आता येथे घोडे बांधण्यात येत आहे. या घोड्यांमुळे या अपूर्ण ईमारतील तबेल्याचे स्वरूप येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याची समस्या उद्भवत आहे.
अमरावती जिल्ह्यात अश्वांपासून मानवाला होणाºया ग्लँडर या आजाराने अश्वांना ग्रासल्याचे समोर आले आहे. याच काळात भर वस्तीत असलेल्या ठाकरे मार्केट या भागात अश्व आल्याने नागरिकांच्या आरोग्याला अपाय निर्माण होत आहे. अश्वांना हा आजार झाल्यास त्याच्यावरही औषधोपचार नाही. यामुळे त्या घोड्यांना जीवे मारण्याशिवाय पर्याय नाही. या आजारात अश्वावरच औषध उपयोगी ठरत नाही तर मग नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. वर्धेत या आजाराची लागण टाळण्याकरिता या अश्वमालकांनी केलेले हे अतिक्रमण काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहराचे मैदान खंडर
पालिकेच्या अधिकारात असलेल्या अर्धवट बांधकामामुळे या भागातील एक मोठे मैदान शहराने गमावले. शिवाय लाखो रुपये खर्च करून उभरण्यात आलेल्या या खंडरात अनेक अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. याची माहिती पालिकेसह पोलिसांना आहे. मात्र कारवाईच्या नावावर काहीच होत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
इमारतीच्या परिसरात चार शाळा
घोड्यांचा तबेला बनू पाहत असलेल्या या अर्धवट ईमारतीच्या परिसरात चार शाळा आहे. यात वर्धा शहरातील मोठी शाळा म्हणून नाव लौकीक असलेली न्यू इंग्लिश हायस्कूल आहे. शिवाय याच भागात खुद्द पालिकेची प्राथमिक शाळा आहे. या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या हजारावर आहे. येथे पसरल असलेल्या दुर्गंधीचा या चिमुकल्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या शिवाय अग्रगामी कॉन्व्हेंट आणि महिला मंडळाचीही शाळाही आहे.
तबेल्याबाबात पालिकेलाही माहिती नाही
अर्धवट असलेली ही इमारत वर्धेतील वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यांचे पेपर ठेवण्याकरिता पालिकेत ठराव सादर करण्यात आला होता. मात्र पालिकेच्या मालकीची ईमारत असा ठराव घेवून वापरण्याकरिता देणे शक्य नसल्याचे तो ठराव बारगळला. आता येथे घोड्याचा तबेला सुरू झाल्याने हा प्रकार नेमका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पालिकेला विचारणा केली असता तेही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे.
या इमारतीत वाढलेले गवत आताच काढण्यात आले; मात्र येथे घोड्यांचा तबेला तयार होत आहे याबाबत काही माहिती नाही. पालिकेच्या मालमत्तेचा असा कोणीही दुरूपयोग करणे योग्य नाही. यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.
- अतुल तराळे, नगराध्यक्ष वर्धा
पालिकेच्या मालकीची असलेली ही इमारत काही तांत्रिक अडचणीमुळे अर्धवट आहे. परंतु त्याचा कोणी गैरवापर करत असेल तर ते योग्य नाही. यावर कारवाई करण्यात येईल.
- निलेश किटे, बांधकाम सभापती, पालिका वर्धा.