रुग्णालय वसाहतीचे बांधकाम चार वर्षांपासून रखडलेले
By admin | Published: April 14, 2017 02:19 AM2017-04-14T02:19:17+5:302017-04-14T02:19:17+5:30
विकास कामासाठी लाखो रुपये आणून भूमिपूजन उरकले जाते; पण तीे कामे चार वर्षांतही पूर्ण होत नसल्याने विकास कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
२०१३ मध्ये झाला कामाला प्रारंभ : कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
सेलू : विकास कामासाठी लाखो रुपये आणून भूमिपूजन उरकले जाते; पण तीे कामे चार वर्षांतही पूर्ण होत नसल्याने विकास कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. येथील रुग्णालयाच्या वसाहतीचे काम चार वर्षांपासून खितपत पडले आहे. यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देत बांधकाम त्वरित पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.
सेलू ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते तत्कालीन आमदारांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. बांधकाम विभागाकडून सदर कामाचे ३ कोटी ४९ लाख १५ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले. कंत्राटदारानेही त्वरित बांधकामाला सुरूवात केली. एक वर्षात हे काम पूर्ण होईल. अधिकारी व कर्मचारी रुग्णालय परिसरातच राहतील. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली व तत्पर सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते; पण चार वर्षांचा कालावधी लोटला असताना बांधकामाची कासव गती कायम आहे. हे बांधकाम कधी पूर्ण होणार, ही प्रतीक्षा कायम आहे. या कामाला आजपासून किती वर्ष लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची काम करून घेण्याची गती मंदावण्यामागचे नेमके कारण काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. निवासस्थाने नसल्याचे कारण पूढे करून कर्मचारी मात्र जिल्हा तसेच उपराजधानीच्या ठिकाणावरून ये-जा करीत आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीचा फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. हे काम पूर्ण करण्याचा तसेच काम पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरूस्तीचा कालावधीही इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच संपलेला आहे. तालुक्यात बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही वसाहत बांधली जात असताना कामाची गती मंदावली आहे. लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत वसाहतीचे बांधकाम त्वरेने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी)
आधी कामाला सुरूवात, नंतर भूमिपूजन
३ कोटी ४९ लाख १५ हजार रुपयांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाला ३० मार्च २०१३ रोजी सुरूवात झाली होती. यानंतर तब्बल २५ दिवसांची या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. कामाला सुरूवात झाल्यानंतर भूमिपूजन झाल्याची बाब तेथे लावलेल्या फलकावरूनच समोर येत आहे
काम पूर्ण करण्याचा कालावधी संपला
कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाल्यापासून १३ महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचा लिखित करार झाला होता. यानुसार मुदत ३० एप्रिल २०१४ रोजी संपली. दोन दुरूस्तीचा कालावधी २४ महिन्यांचा होता. ती मुदतही पूर्ण झाली आहे; पण अद्याप या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले नाही.