१२ रुग्णालये ‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:11+5:30
‘एनक्यूएएस’ हा रुग्णालयांना दिल्या जाणारा महत्त्वाचा बहूमान आहे. २०१७ मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहूर, खरांगणा (मो.), कन्नमवारग्राम, विजयगोपाल, अल्लीपूर, हमदापूर, मांडगाव व सिंदी रेल्वे या प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुलगाव व सेलू ग्रामीण रुग्णालय आणि आर्वी उपजिल्हा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाची निवड हा बहुमान मिळविण्यासाठी करण्यात आली होती.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात एकूण २२० शासकीय रुग्णालय आहेत. त्यापैकी तब्बल १२ शासकीय रुग्णालय सध्या ‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेत आहेत. साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील हा बहूमान २०१७ मध्ये मिळाला असून सध्या हे रुग्णालय गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर यंदा १७ व १८ सप्टेंबरला तीन प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी राज्यस्तरीय चमूने केली असून येत्या काही दिवसात राज्यस्तरीय चमू जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणार आहे. ही चमू त्यांचा अहवाल राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सादर करणार आहे.
‘एनक्यूएएस’ हा रुग्णालयांना दिल्या जाणारा महत्त्वाचा बहूमान आहे. २०१७ मध्ये वर्धा जिल्ह्यातील साहूर, खरांगणा (मो.), कन्नमवारग्राम, विजयगोपाल, अल्लीपूर, हमदापूर, मांडगाव व सिंदी रेल्वे या प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुलगाव व सेलू ग्रामीण रुग्णालय आणि आर्वी उपजिल्हा रुग्णालय, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाची निवड हा बहुमान मिळविण्यासाठी करण्यात आली होती.
त्या वर्षी विविध स्तरावर मुल्यांकन झाल्यानंतर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या साहूर या प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘एनक्यूएएस’ मानांकन प्राप्त झाले आहे. मानांकन प्राप्त झाल्यानंतर साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालयाची आरोग्य सेवा देण्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. तर २०१८-१९ मध्ये पुन्हा याच आठ प्राथमिक आरोग्य केंद्रासह दोन ग्रामीण रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय व वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे. सदर मानांकन प्राप्त झालेल्या रुग्णालयाला शासनाकडून विविध सवलती आणि मोठ्या प्रमाणात अतिरिक्त निधी प्राप्त होत असून तो रुग्णसेवेसाठीच खर्च केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा उद्देश जोपासला जात आहे.
राज्यस्तरीय चमूने तीन प्राथमिक आरोग्य केंद्राची केली तपासणी
‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेत असलेल्या रुग्णालयाचे विविध स्तरावर मुल्यांकन केले जाते. त्यासाठी विविध स्तरावरील अधिकाऱ्यांची चमूही त्या रुग्णालयाला भेट देत त्या रुग्णालयाची तपासणी करते. २०१८-१९ मध्ये ‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेत असलेल्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी खरांगणा (मो.), कन्नमवारग्राम व विजयगोपाल या प्राथमिक आरोग्य केंद्राला सप्टेंबर महिन्याच्या १७, १७ तारखेला राज्यस्तरीय चमूने भेट देऊन पाहणी केली आहे. ही चमू त्यांचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
अन् जिल्हा रुग्णालयाला मिळेल प्रति रुग्णखाट १० हजारांचा अतिरिक्त निधी
‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेत असलेल्या वर्धा जिल्हा रुग्णालयाला तसेच आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय स्तरावरील हा बहुमान मिळाल्यास त्या रुग्णालयाला तेथे असलेल्या प्रत्येक रुग्णखाटेला गृहीत धरून १० हजार रुपये प्रति रुग्णखाट असा अतिरिक्त निधी शासनाकडून मिळणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही उल्लेखनीय कामगिरीसाठी कामाला लागली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आठ विभागांचा समावेश
‘एनक्यूएएस’ मानांकनाच्या स्पर्धेसाठी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. यात प्रसुती कक्ष, प्रसुतीपूर्व कक्ष, प्रसुती पश्चात कक्ष, विशेष नवजात शिशु कक्ष, रक्त पेठी, पोषाहार कक्ष, बालरोग कक्ष आणि आपातकालीन कक्षाचा समावेश आहे. या रुग्णालयात राज्यस्तरीय चमू तपासणीसाठी ८ किंवा ९ आॅक्टोबरला येण्याची शक्यता आहे.
‘समाधान’ आणि ‘स्वच्छ’ला दिले जाते महत्त्व
‘एनक्यूएएस’ मानांकन मिळण्यापूर्वी होणाºया विविध मुल्यांकनादरम्यान स्वच्छतेला अतिशय जास्त महत्त्व दिल्या जाते.
इतकेच नव्हे तर रुग्णांचे अधिकार, रुग्णांचे समाधान, रुग्णांना दिली जाणारी सेवा आदीही या बहुमानासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळतो ३ लाखांचा अतिरिक्त निधी
‘एनक्यूएएस’ मानांकन मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाकडून प्रत्येक वर्षी ३ लाखांचा अतिरिक्त निधी मिळतो.
साहूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला हा बहुमान मिळाल्याने त्याला हा निधी मंजूर झाला आहे. परंतु, आतापर्यंत या रुग्णालयाला शासनाकडून दोन लाखांचाच निधी मिळाल्याचे वास्तव आहे.
तर उर्वरित निधीची साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतीक्षा आहे.
नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. त्यातही स्वच्छता, रुग्णाचे समाधान यावर अधिक भर दिला जात आहे. ‘एनक्यूएएस’ मानांकनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आठ विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.