‘व्हायरल फ्ल्यू’ने रुग्णालये फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:11 PM2017-10-04T23:11:15+5:302017-10-04T23:11:25+5:30
वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वातावरणातील बदल व अत्यल्प पावसामुळे सध्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ढगाळ वातावरण तथा ठिकठिकाणी वाढणारा डासांचा प्रादुर्भाव आदींमुळे सध्या व्हायरल फ्ल्यूचे रुग्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावात आढळून येत आहेत. विविध आजारांची लागण झालेले नागरिक रुग्णालयांमध्ये एकच गर्दी करीत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी दक्ष राहून परिसर आणि स्वत:ची स्वच्छता हा फॉर्म्यूला वापरावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
१ हजार १२६ तापाचे रुग्ण
पावसाचे पाणी छतावर, तुटलेल्या मातीच्या व इतर भांड्यात आदी ठिकाणी साचते. शिवाय रिकाम्या प्लॉटवरही पावसाचे पाणी साचते. सदर ठिकाणांसह विविध ठिकाणी साचणाºया पाण्यात झपाट्याने डासांची निर्मिती होते. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आदी आजार होतात. चार महिन्यांत जिल्ह्यातील १ हजार १२६ नागरिकांना तापाची लागण झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. विविध आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.
सहा फुटाचे ठेवावे अंतर
व्हायरल फ्ल्यू झालेल्या रुग्णाने शक्यतोवर आठ दिवस घरीच विश्रांती घ्यावी. त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला रूमाल बांधून जावे. व्हायरल फ्ल्यूची लागण झालेल्या व्यक्तीपासून इतर नागरिकांनी किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे. शिवाय हस्तांदोलन करण्याचेही टाळावे. या लहान-लहान गोष्टी नागरिकांनी केल्यास व्हायरल फ्ल्यूच्या होणाºया झपाट्याने प्रसाराला आळा बसेल.
२ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने
वर्धा जिल्ह्यातील अनेक नागरिक विविध कामानिमित्त नागपूर येथे दररोज ये-जा करतात. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सध्या स्वाईन फ्ल्यूचे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू हा आजार येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील चार महिन्यांत स्वाईन फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळलेल्या २ हजार ३८९ रुग्णांच्या थुंकीचे नमूने तपासणीकरिता घेण्यात आले. यापैकी दोन व्यक्ती संशयित असल्याचे लक्षात येताच पुढील तपासणीकरिता नमूने पूणे येथे पाठविण्यात आले आहेत.
डायरियाच्या ६४१ रुग्णांची नोंद
अशुद्ध पाणी व उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने डायरिया या आजाराची लागण होते. पावसाळ्याच्या दिवसांत सदर आजाराची लागण झालेले रुग्ण सर्वाधिक आढळून येतात. मागील चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६४१ नागरिकांना डायरियाची लागण झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. वेळोवळी वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी योग्य दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वातावरणातील बदलामुळे सध्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. विविध आजारांच्या बचावासाठी नागरिकांनी स्व:स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेतली पाहिजे. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्यासह अन्य लहान-सहान बाबी नागरिकांनी केल्या पाहिजेत. नागरिकांना योग्य आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न आम्ही करीत असून नागरिकांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.
- डॉ. निवृत्ती राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.