तप्त उन्हात चौकार-षटकारांची बरसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2015 02:29 AM2015-06-08T02:29:04+5:302015-06-08T02:29:04+5:30
अबे बॉल स्टंप ला लागला ना यार, तू आऊट झाला, तु नेहमीच चिडी खेळतो... आरं नाही बावा बॉल दुरून गेला... बॉल टाक आऊट वगैरे नाही न रे....
पराग मगर वर्धा
अबे बॉल स्टंप ला लागला ना यार, तू आऊट झाला, तु नेहमीच चिडी खेळतो... आरं नाही बावा बॉल दुरून गेला... बॉल टाक आऊट वगैरे नाही न रे.... असे खोडकर पण गोड संवाद सध्या शहरात, गावोगावी गल्ल्यागल्ल्यांमध्ये, शाळांच्या मैदानांवर भर उन्हात ऐकायला मिळत आहेत. यात अनेकदा भांडणेही होतात. पण ती तात्पुरती. लगेच कट्टी आणि बट्टी होऊन गल्लीतील क्रिकेट टीम पुन्हा खेळायला सज्ज होते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांचा आवडता खेळ असलेल्या क्रिकेटची सध्या सर्वत्र धूम सुरू आहे. आयपीएलचा ज्वर आत्ताच उतरला असला तरी क्रिकेटचा ज्वर मुलांमध्ये आताकुठे चढायला लागला आहे. वर्दळ असतानाही गावांतील गल्ल्यांमध्ये मुलांचा क्रिकेटदंगा पहावयास मिळत आहे. गावांतील शाळांची मैदाने, खाली भूखंडांवरही मुलांची गर्दी पहावयास मिळत आहे.
क्रिकेट हा खेळच मुळात श्रीमंतांचा कमी आणि गरिबांचाच जास्त, त्यातल्या त्यात गल्ली क्रिकेटसाठी तर खूप खर्च नसतोय. साधी बॅट, प्लास्टिकचा बॉल, स्टंप म्हणून खर्ची, सायकलचा रिंग, टायर, साध्या तीन काड्या आणि दुसरीकडे एखादी वीट किंवा दगड असे कुठलेही साधन चालते. तसेच खूप जास्त जागेचाही सोस नसतो. गडीही चार, पाच असेल तरी काम भागते. मॅचही कमीत कमी ओव्हरची, असा सुटसुटीत खेळ असल्याने गल्ल्यागल्ल्यांमध्ये सध्या क्रिकेटच्या मॅचेस व्हायला लागल्या आहे.
त्यात मग एका गल्लीतील मुलांची दुसऱ्या गल्लीतील मुलासोबत मॅचही असते. मुख्य म्हणजे हा सर्व प्रकार दुपारच्या रणरणत्या उन्हा सुरू असतो. पालकांकडून सुरुवातीला होत असलेला विरोध हळूहळू मावळू लागतो. कारण मुलांना खेळू नका म्हणून सांगणं म्हणजे स्वत:च्या झोपेचा खोळंबा करून घेणे असते. त्यामुळे त्यांनी खेळलेलेच बरे असे म्हणत मुलांना खेळण्याची मुभा दिली जाते आणि अबे तू आऊट म्हणत सायंकाळी खेळ संपतो. सुट्ट्या संपायला अद्याप अवकाश आहे. त्यामुळे तोपर्यंत दररोज हेच चित्र नजरेस पडते.