हॉटेल शिवची अन्न व औषधी विभागाकडून तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:31 PM2017-11-07T23:31:24+5:302017-11-07T23:31:35+5:30
धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव येथे नगर परिषदेच्या कारवाईनंतर मंगळवारी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धंतोली चौक परिसरात असलेल्या हॉटेल शिव येथे नगर परिषदेच्या कारवाईनंतर मंगळवारी अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली. या तपासणीत पालिकेच्या सूचनेनंतरही कमालीची अस्वच्छता असल्याचे दिसून आले. यामुळे सदर हॉटेल मालकाला १५ दिवसांची सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. या १५ दिवसांत जर त्याने आवश्यक सुधारणा केल्या नाही तर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अन्न व औषधी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
अन्न व औषधी विभागाच्यावतीने मंगळवारी केलेल्या तपासणीत येथे अन्न झाकून नसल्याचे दिसून आले. शिवाय उरलेले उष्टे अन्न झाकून ठेवण्यात येत नसल्याचे दिसून आले. याच अन्नावर असलेल्या माशा इतर अन्नावर बसत असून त्यातून आजार पसरत असल्याचे निदर्शनास आले. पदार्थ तयार करण्याचे ठिकाणही उघड्यावर असल्याने येथेही अस्वच्छता दिसून आली. शिवाय कोणत्याही कारागिराच्या अंगावर अॅपरॉन नाही, त्यांची वैद्यकीय तपासणी केलेले नसल्याचे प्रमाणपत्र येथे नसल्याचे दिसून आले आहे. या बाबी नियमांना बगल देणाºया असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हॉटेलवर पालिकेच्यावतीने करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचे दिसून आले. यात आता पुन्हा अन्न व औषधी विभागाच्यावतीने आज येथे धाड घातली. या धाडीतही येथे अनियमितता असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या हॉटेलावर कारवाई अपेक्षित आहे. या तपासणीच्यावेळी अन्न व औषधी प्रशासनाचे रविराज धाबर्डे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर कारवाई
पालिकेच्यावतीने केलेल्या कारवाईनंतर या हॉटेलावर अन्न व औषधी विभागाच्यावतीने तपासणी होणे गरजेचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत अन्न व औषधी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
पालिकेने केला होता पाच हजारांचा दंड
पालिकेच्यावतीने सोमवारी या हॉटेलावर धाड घातली. या धाडीत येथे अस्वच्छता असल्याचे दिसून आल्याने या हॉटेल मालकाला पालिकेच्यावतीने पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेच्यावतीने आणखी एक वेळा धाड टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही कमतरता असल्यास थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.