मृतदेहासह संतप्त जमाव तहसील कार्यालयात
By admin | Published: July 7, 2015 01:38 AM2015-07-07T01:38:12+5:302015-07-07T01:38:12+5:30
अधिकृतपणे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रविवारी झालेल्या कारवाईनंतर काही तासातच म्हणजे ...
कारवाईनंतर रेती व्यावसायिकाचा मृत्यू : तलाठी व तहसीलदारावर कारवाईची मागणी
आष्टी (शहीद): अधिकृतपणे रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रविवारी झालेल्या कारवाईनंतर काही तासातच म्हणजे रात्री १० वाजता ट्रॅक्टरमालक श्रीकृष्ण भुयार रा. गोदावरी याचा मृत्यू झाल्याने तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली.
या घटनेने संतप्त झालेल्या गोदावरी येथील नागरिकांनी संबंधित तलाठी व तहसीलदारावर कारवाईच्या मागणीला घेऊन तहसील कार्यालयात मृतदेह घेऊन धडक दिली. दुुपारी २ वाजतापासून यावर कोणताही तोडगा निघाला नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
यावर अखेर उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे यांनी नागपूर येथून येत नागरिकांशी चर्चा करीत ४८ तासांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर मृतदेह गोदावरी येथे नेण्यात आला होता. तोपर्यंत तहसील कार्यालयात मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती.
भुयार यांच्या ट्रॅक्टरने ईस्माइलपूर घाटातून रेती नेत असताना तलाठी ए.डी.जगताप यांनी रविवारी ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणला. त्याला १७ हजार ९०० रुपयांचा ठोठावला. तरीही रविवारी दुपारी ट्रॅक्टरमालकाच्या घरी जात २० हजारांची मागणी केली. तहसीलदारासह तलाठ्याचा दबाव वाढत असतानाच श्रीकृष्ण भूयार यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नागरिक करीत आहे.
सोमवारी सकाळी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह तळेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आला. येथे तलाठी जगतापवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर मृतदेह घेऊन नागरिकांनी आष्टी तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळविला. गोदावरी येथील शेकडो नागरिक तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदाराच्या कक्षात मृतदेह ठेवून तलाठ्याच्या निलंबनाची मागणी लावून धरली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक राजन पाली, आर्वीचे ठाणेदार शैलेश साळवी, कारंजाचे ठाणेदार चौधरी, तळेगावचे ठाणेदार दिनेश झामरे, आष्टीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्यासह ५० पोलिसांची कुमक तहसील कार्यालयात तैनात झाली.
तहसीलदार मृदुलता मोरे यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तलाठी जगताप यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला. यावरही गावकऱ्यांचे समाधान झाले नाही. तलाठी निलंबित झाल्याशिवाय मृतेदह हलविणार नाही, असा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. आष्टी तहसील कार्यालयात सुमारे ३ तास तणावाचे वातावरण होते. तहसीलदार व तलाठ्याच्या भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पाठविणार असल्याची माहिती मृतकाचे भाऊ नंदकिशोर भुयार यांनी दिली. चौकशीच्या आश्वासनाने प्रकरण निवळले.(प्रतिनिधी)
आरडीसी दीड तास वेटींगवर
निवासी जिल्हाधिकारी वैभव नावडकर दीड तास तहसीलदारांना वेट करा एवढेच सांगत होते. जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या नावाखाली वेळ नाही एवढाच संदेश देत होते.
तहसीलदारांवर गुन्हा दाखल करा
मृतकाच्या नातलगांनी तहसीलदार मृदुलता मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. दरम्यान मोरे यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती चुकीची सांगितल्याने मृतकाच्या जावायाने त्यांना चांगलेच धारेवर धरले.
एसडीओ नागपूरला
उपविभागीय महसूल अधिकारी शुभांगी आंधळे यांनी नागपूरला असून कारवाई आधी चौकशी करू, पाहू या उत्तराने नागरिक आणखीच संतप्त झाले होते.