गॅस सिलिंडरच्या आगीत घर बेचिराख; १८ तास उलटुनही हवालदील कुटुंबाला शासकीय मदत नाहीच
By महेश सायखेडे | Published: April 17, 2023 05:23 PM2023-04-17T17:23:26+5:302023-04-17T17:23:46+5:30
बडगे कुटुंबाने रात्र काढली शेजाऱ्याच्या घरी
आर्वी (वर्धा) : स्वयंपाक करीत असताना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला. या आगीत वर्धमनेरी येथील बडगे कुटुंबाचे संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले. शिवाय घरही बेचिराख झाल्याने या कुटुंबाला शेजाऱ्याच्या घरी आसरा घेत रात्र काढावी लागली. घटना घडून तब्बल अठरा तासांचा कालावधी लोटला असला तरी या हवालदिल कुटुंबाला तालुका प्रशासनाने कुठलीही तातडीची शासकीय मदत दिलेली नाही, हे विशेष.
आशीष बडगे हे पत्नी व मुलींसोबत आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथे वास्तव्याला आहेत. बडगे कुटुंबातील एकूण आठ सदस्य एकाच घरात राहतात. रविवारी रात्री स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा भडका उडत आशीष बडगे यांच्या घराला आग लागली. यात आशीषची चार वर्षीय मुलगी तनु तसेच आठ वर्षीय मुलगी अंजली भाजल्या गेली. त्यामुळे त्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थीर असली तरी या आगीत बडगे कुटुंबाच्या घरातील विविध संसारउपयोगी साहित्य, महत्त्वाचे कागदपत्रे, घरात असलेली रोख आदी जळून कोळसा झाल्याने त्यांचे सुमारे साडेचार लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे.
वर्धमनेरी येथे सिलेंडरनं घेतला पेट; आग लागून दोन मुली भाजल्या
ग्रामस्थांचे सहकार्य ठरले मोलाचे
आगीची माहिती मिळताच आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
तलाठ्याने तालुका प्रशासनास सादर केला अहवाल
वर्धमनेरी येथील आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तसेच तलाठ्यांनी घटनास्थळ गाठले. नुकसानग्रस्ताला तातडीची शासकीय मदत मिळावी या हेतूने तलाठ्याने आपला अहवाल तालुका प्रशासनाला सादर केला असल्याचे सांगण्यात आले. पण अठरा तासांचा कालावधी लोटूनही उघड्यावर संसार आलेल्या या आगग्रस्त कुटुंबाला कवडीचीही शासकीय मदत मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गॅस सिलिंडरचा भडका उडत आग लागल्याने घर जळाले. तलाठ्यांनी या घटनेच्या नुकसानीचा पंचनामा करीत तो तालुका प्रशासनाला सादर केला आहे. तलाठ्यांनी आपल्या अहवालात आगीत २.८० लाखांचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे.
- विनायक मगर, प्रभारी तहसीलदार, आर्वी.