उत्पादन व हमीभाव कमी असताना उत्पन्न दुप्पट कसे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:46 PM2018-01-05T23:46:44+5:302018-01-05T23:46:55+5:30

शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले.

 How to double the yield while reducing productivity and reducing | उत्पादन व हमीभाव कमी असताना उत्पन्न दुप्पट कसे होणार

उत्पादन व हमीभाव कमी असताना उत्पन्न दुप्पट कसे होणार

googlenewsNext
ठळक मुद्देविजय जावंधिया : शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : शेतमालाचे उत्पादन कमी व त्यांचे बाजारभावही कमी असताना सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केंद्र व राज्य सरकारची एक लोणकढी थाप असल्याचे प्रतिपादन शेतकरी नेते विजय जावंधीया यांनी केले. ते येथील शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते.
रोहणा येथील युवा शेतकरी मंचच्यावतीने शेतकरी व शेतमजूरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर साहित्यिक तथा लेखक डॉ. वासुदेव डहाके, सरपंच सुनील वाघ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जावंधिया पुढे म्हणाले, सरकारने मुक्त अर्थव्यवस्था सन १९९७ पासून स्वीकारताना शेतकरी आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारात नेवून चांगले भाव मिळवू शकतो, असे स्वप्न दाखविले. परंतु, कोणताच शेतकरी आपला शेतमाल तेथपर्यंत नेवू शकला नाही. परिणामी, उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला. अन् मधले दलाल व मालामाल झाले आहेत. त्यातच शेतकºयांच्या आत्महत्या सुरू झाल्या. या थांबावयाचे नाव घेत नाही. आंतराष्ट्रीय बाजारात सध्या साखेरेचे भाव २४ रूपये प्रती किलो असताना आपल्याला साखर ४० ते ४२ रूपये भावाने घ्यावी लागत आहे. यासाठी शरद पवार विविध आयुधाचा वापर करीत शासनावर दबाव टाकतात. शिवाय कापसाचा भाव न परवडणारा असताना त्यासाठी आपण काहीच कां करीत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी राष्ट्रीवादीला केला.
शेतमालाचे भाव पडत असताना सरकारला सबसिडी मागणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, ती भिक नाही. या गोष्टी युवा शेतकºयांनी समजून घेवून आता आपल्या मागण्यांची व आंदोलनाची दिशा बदलवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांसाठी दर १० वर्षांनी वेतन आयोगाचा विचार होतो. पाचव्या वेतन आयोगात शासनातील चपराश्याला पगार २ हजार ५०० रूपये होता. तो सहाव्या वेतन आयोगात ७ हजार झाला. तर दहा वर्षांनी कर्मचऱ्यांचा पगार तिप्पट होत असताना सन १९७४ मध्ये गव्हाचा भाव ७४ रूपये प्रती क्विंटल होता. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या वेगाने गव्हाचा भाव. वाढला असता तर तो सन २०१४ मध्ये सहा हजार प्रती क्विंटल गव्हाला पाहिजे होता; पण आज २०१८ मध्येही गव्हाला १ हजार ५०० ते १ हजार ७०० रूपयेच भाव मिळत आहे. याचा अभ्यास युवा शेतकऱ्यांनी करून यासाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकेकाळी आमच्या सोबत कापसाला ७ हजार रूपये भाव मागणारे आजचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सध्या शेतमालाचे हमीभाव शेतकऱ्यांना फायद्यात आणणारे असल्याचे सांगतात. तेव्हा सत्ता मिळाली की, लोकप्रतिनिधी देखील शेतकऱ्यांना कसे विसरतात हे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी उपस्थितांच्या लक्षात आणून दिले. मेळाव्याचे संचालन युवा शेतकरी हितेंद्र बोबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार भारत शेंडे याने मानले. मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांवर ओढले ताशेरे
येथील शेतकरी व शेतमजुरांच्या मेळाव्यात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसह शेतमजुरांना शासनाने दिलेली विविध आश्वासने कशी शेतकऱ्यांच्याच विरोधात जातात याची माहिती उदाहरणे देत दिली. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

Web Title:  How to double the yield while reducing productivity and reducing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.