शिवमचा मृतदेह गाद्यांखाली कसा? आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 11:11 AM2023-09-01T11:11:59+5:302023-09-01T11:14:51+5:30
पालकांना घातपाताचा संशय : पोलिस तपासाकडे लागले लक्ष
कारंजा (घाडगे) (वर्धा) : तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत बुधवारी (दि. ३०) रक्षाबंधनाच्या दिवशी एका विद्यार्थ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या पालकांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून, घातपाताचा संशय व्यक्त केल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.
आश्रमशाळेतील १३ वर्षीय विद्यार्थी शिवम सरोज उईके, रा. डोमा, ता. चिखलदरा, जि. अमरावती याचा गादीखाली दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृत शिवम इयत्ता सातवीमध्ये होता. शिवम शाळेतील होस्टेलच्या गाद्या ठेवतात त्या खोलीत गाद्यांच्या ढिगावर झोपला होता. झोपता झोपता त्याने कड पलटवण्याचा प्रयत्न केला असता, तो खाली पडला. त्याच्या अंगावर गाद्या पडल्या. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शाळा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
शिवम हा सकाळी ७:३० ते ८:३० च्या दरम्यान नाश्ता घेण्यासाठी उपस्थित होता. सकाळी ९ वाजता त्याने वर्गात हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर तो दिवसभर दिसला नाही. रात्री ८:३० च्या सुमारास त्याचा मृतदेहच सापडला. घटना घडताच आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनेक पालक आपल्या पाल्यांच्या भेटीसाठी शाळेत आले आहेत. आदिवासी आश्रमशाळेत वर्ग पहिली ते दहावीपर्यंतचे सुमारे २८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी मेळघाट व मध्य प्रदेश परिसरातील आहेत.
शिवमचा शाळा सोडण्याचा दाखला अर्ज देऊन मागितला होता. मात्र, दाखला दिला नाही. पोलिसांनी घटनास्थळावरही जाऊ दिले नाही. ज्याठिकाणी मृतदेह आढळून आला तेथे रक्ताचे डाग दिसले. शिवमच्या डोक्यालाही रक्त लागून होते. ज्या गाद्यांच्या ढिगावरून शिवम पडला तो ढीग एक ते सव्वा मीटर उंचीचा आहे. तेवढ्या अंतरावर पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू नसून, त्याचा घातपात आहे. मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व अधीक्षक यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे.
- सनोज फत्तेसिंग उईके, मृत शिवमचे वडील.
शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम असल्यामुळे मी त्या कामांमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे घटना उशिराने माहिती पडली. दुपारी जेवणावेळी शिवम जेवायला हजर नव्हता. दुपारी ४ वाजेच्या सुटीनंतर विद्यार्थ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सामान्यपणे अधीक्षकांची असते. मला ही बाब स्वयंपाकी गिऱ्हाळे यांनी फोनद्वारे सांगितली. त्यानंतर काही वेळातच आम्ही घटनास्थळी दाखल झालो व घटनेची माहिती जाणून घेतली.
- हेमंत भगत, मुख्याध्यापक, आदिवासी आश्रमशाळा.
जेवणाच्या वेळी मी मुले मोजली तेव्हा कमी भरली. ही बाब मी मुख्याध्यापकांना सांगितली. उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन मुली जेवणासाठी आल्या नाहीत, हे सुद्धा सांगितले. कालच आजारी विद्यार्थ्यांना औषध वितरित केले. नंतर शाळेत काम केले. ३० रोजी वर्धा येथील योग शिक्षक शाळेत आल्याने पुन्हा ५ वाजण्याच्या सुमारास मुले गोळा केली. नियमित सकाळी व संध्याकाळी मुलांची हजेरी घ्यावी लागते; परंतु व्यस्त कामामुळे चुकीने माझ्याकडून संध्याकाळची मुलांची हजेरी घेण्यात आली नाही. मला ही बाब शाळेतील शिपायाकडून कळली व मी लगेच शाळेच्या मुख्याध्यापकांना फोनद्वारे माहिती दिली.
- राजेंद्र नासरे, पोस्टल अधीक्षक.
नागपूरमध्ये होणार उत्तरीय तपासणी
शाळा व्यवस्थापकाने कुठल्याच प्रकारची माहिती दिली नाही. हा सर्व प्रकार बघता उईके कुटुंबियांनी संबंधित शाळा व्यवस्थापन विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत शवविच्छेदन थांबवून ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी प्रशासनाने त्यांना विश्वासात घेत आश्वासन दिले व त्यानंतर नागपूर येथे इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे.