थंडावलेल्या खेम्यात पवार किती भरणार ऊर्जा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:43 PM2017-11-17T22:43:19+5:302017-11-17T22:44:28+5:30
राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विदर्भ दौरा बुधवारपासून सुरू झाला.
अभिनय खोपडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा विदर्भ दौरा बुधवारपासून सुरू झाला. शनिवारी येथील जुन्या नेत्यांसह नव्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. सध्या राष्ट्रवादी खेम्यात प्रचंड स्मशान शांतता आहे. पक्षाचे संघटन पूर्णत: खिळखिळे झाले आहे. अशा स्थितीत शरद पवारांचा हा दौरा पक्षात किती ऊर्जा भरू शकतो हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
कोणतीही निवडणूक नसताना शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर निघाले आहे. कामाच्या व्यस्ततेत सर्व सामान्य कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे आता या काळात शरद पवारांनी विदर्भावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच विदर्भात पक्षाची स्थिती कधीही भक्कम राहिली नाही. विदर्भात पूर्वी राकाँचे चार आमदार होते. त्याची संख्या आता दोनवर आली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती असलेल्या सहकारी बँका, सूतगिरण्या व शैक्षणिक संस्थांना टाळे लागले आहे तर काही लागण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची धुरा सांभाळणाºया नेत्यांचीही भाजपाच्या झंझावातात दयनीय अवस्था आहे. वर्धा जिल्ह्यात आमदार म्हणून प्रा. सुरेश देशमुख यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी एकदा संधी दिली. तर हिंगणघाटमधून प्रा. राजू तिमांडे एक वेळा आमदार राहिलेत. मात्र भाजपच्या झंझावात राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले ढासळले. आजही जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. नव्हे तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अॅड. सुधीर कोठारी यांनी अतिशय उत्तमपणे चालवून महाराष्ट्रात विदर्भाच्या सहकाराचा नावलौकिक वाढविण्याचे काम केले आहे. ऐवढीच एक जमेची बाजू राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यात दिलासा देणारी आहे. त्यामुळे शरद पवारांना पक्षाची धुरा आता नवीन लोकांकडे जिल्ह्यात देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. जुन्या शिलेदारांच्या भरवशावर पक्ष मजबूत करता येणार नाही.
सर्वसामान्यांचा विश्वास उडालेले नेतृत्व पक्षात नवीन जान फुंकू शकत नाही. सहकार व बँकींग क्षेत्राची वाट लावणाऱ्या लोकांच्याच भोवती पक्ष फिरत ठेवण्यापेक्षा चांगले काम करणारे लोक पक्षाशी जोडणे केव्हाही लाभदायक ठरेल, अशी भावना सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या या भावनेची दखल या निमित्ताने पवारांनी घेतली तरच दौºयाचे फलीत होईल.
जुन्या सहकाऱ्यालाही भेटणार
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून वर्धा जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून माजी आमदार प्रा. वसंतराव कार्लेकर यांच्याकडे पाहिले जाते. कार्लेकरांचा शब्द पवारांनी कधीही पडू दिला नाही. विदर्भ दौºयात वर्ध्याला येतानाही कार्लेकरांच्या घरी ते भेटीसाठी जाणार आहेत. गेल्यावर्षी वसंतराव कार्लेकरांचे सुपूत्र मरण पावलेत. त्यावेळी शरद पवार येऊ शकले नाही. त्यामुळे यावेळी त्यांच्या भेटीमागे सांत्वनाची किनार आहे. अनेक वेळा प्रा. कार्लेकर दिल्लीला पवारांच्या भेटीसाठी दिवंगत अनिल मेघे यांना घेऊन जात होते. ते मेघे ही आता हयात नाही व कार्लेकरांना प्रकृतीमुळे पवारांच्या भेटीसाठी जाता येणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे या जुन्या दोन सहकाºयांच्या भेटीतून अनेक ऋणानुबंधाना उजाळा मिळणार आहे.