तरुण-तरुणी 'सैराट', कुटुंबियांचा राडा; सिंदी(रेल्वे)त तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:46 PM2022-01-11T12:46:25+5:302022-01-11T13:05:30+5:30
सिंदी रेल्वे शहरातील एका युवतीचे लग्न असल्याने ती खरेदी करण्यासाठी नागपूर येथे गेली ती परतलीच नाही. तिला गावातीलच एका युवकाने पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीकडील मंडळी मुलाच्या घरावर चाल करून गेले.
वर्धा : तरुणीला गावातीलच एका तरुणाने फूस लावून पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी संशयित युवकाच्या घरी जाऊन चांगलाच राडा केला. ही घटना रविवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडल्याने सिंदी रेल्वे शहरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाला होता. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी तत्काळ धाव घेत दोन्ही कुटुंबीयांची समजूत घातल्याने वातावरण निवळले.
या घटनेने सोमवारीदेखील शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सिंदी रेल्वे शहरातील एका युवतीचे लग्न असल्याने ती खरेदी करण्यासाठी नागपूर येथे गेली ती परतलीच नाही. तिला गावातीलच एका युवकाने पळवून नेल्याच्या संशयातून तरुणीकडील मंडळी मुलाच्या घरावर चाल करून गेले. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलीस ठाण्यात नागरिकांची गर्दी जमली. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तरुणाच्या घरी जात मुलीकडील मंडळींना समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही ऐकत नसल्याने ठाणेदार चकाटे यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. डीवायएसपी पीयूष जगताप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ सिंदी रेल्वे गावात जात तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.
दोन पथके नागपूरला रवाना
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांची दोन पथके मुलीच्या शोधार्थ नागपूर येथे रवाना झाली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलाविण्यात आली असून, बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
महिनाभराने होता विवाह...
सैराट झालेल्या युवतीचा एका महिन्याने विवाह होणार होता. विवाह असल्याने ती नागपूर येथे आत्याकडे खरेदीसाठी जाते, असे सांगून घरातून निघाली. ती परतलीच नाही. तिने युवकाला बोलावून नागपूर येथून पळ काढल्याची माहिती आहे. तरुणीच्या आत्याने याबाबतची मिसिंगची तक्रारही नागपूर पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच मी तत्काळ सिंदी रेल्वे येथे गेलो. घटनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर मुलीकडील मंडळींची समजूत काढली. पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या गर्दीलाही पांगविले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, प्रकरण निवळले आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी