विकासकामांत प्रचंड गैरप्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:07+5:30
विक्रमशीलानगर झोनअंतर्गत मलनिस्सारण योजना प्रस्तावित आहे. या मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन उपरोक्त रस्त्यानेच मंजूर आहे. मलनिस्सारणाचे काम ज्या भागात करायचे आहे, त्या भागात दुसरे कोणतेच काम करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार यांनी रस्त्याच्या प्रस्तावित ठिकाणी मलनिस्सारण योजना प्रस्तावित नसल्याचे काम करण्यात हरकत नाही, असा चुकीचा, दिशाभूल करणारा अहवाल नोटशिटमध्ये नमूद केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील दोन रस्ते आणि उद्यानाच्या कामात प्रचंड गैरप्रकार झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्षांनी केला असून या सर्वच बांधकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विक्रमशीलानगर झोनअंतर्गत मलनिस्सारण योजना प्रस्तावित आहे. या मलनिस्सारण योजनेची पाईपलाईन उपरोक्त रस्त्यानेच मंजूर आहे. मलनिस्सारणाचे काम ज्या भागात करायचे आहे, त्या भागात दुसरे कोणतेच काम करू नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. तरीही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार यांनी रस्त्याच्या प्रस्तावित ठिकाणी मलनिस्सारण योजना प्रस्तावित नसल्याचे काम करण्यात हरकत नाही, असा चुकीचा, दिशाभूल करणारा अहवाल नोटशिटमध्ये नमूद केला आहे. या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर रस्ता मल:निस्सारण योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी पुन्हा फोडावा लागणार आहे.
या रस्त्याच्या बांधकामात अर्धा फूट खोदकाम करण्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र, खोदकामाला फाटा देण्यात आला आहे. खोदकाम न करता जुन्या डांबर रस्त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर रस्ता बांधकामात कुठेच मुरूम वापरण्यासंदर्भात अंदाजपत्रकात नमूद असताना मुरमाचा सर्रास वापर केला जात आहे.
याबाबत नगर पालिका प्रशासनाला कळविल्यानंतरही कोणतीच कारवाई न करता रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. हा रस्ता सुमारे दीड फूट उंच होत असल्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. असेही माजी नगराध्यक्ष, नगरसेविका त्रिवेणी कुत्तरमारे यांनी म्हटले आहे. या रस्ता बांधकामासह उद्यान निर्मितीची चौकशी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उद्यान निर्मितीतही प्रचंड अनियमितता
प्रभाग क्रमांक ६ व नव्याने बदलेला प्रभाग क्र. १२ येथील गोटेवाडी ते सानेवाडी येथे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून केल्या जात असलेल्या उद्यानाच्या कामात अनियमितता आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांकडे व पॉर्इंट आॅफ आॅर्र्डरच्या माध्यमातून नगराध्यक्षांकडे तक्रार करूनही डोळेझाक करण्यात आली. कंत्राटदारांचे देयक अदा करण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांकडून ‘नो रिस्पॉन्स’
रस्ते बांधकाम आणि उद्यानांच्या निर्मितीसंदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला असता नेहमीप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
बापटवाडी, सानेवाडी मार्गाचे काम दर्जाहीन
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत घांगळे सभागृहासमोरील बापटवाडी ते सानेवाडीकडे जाणाºया रस्त्याचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत रस्त्याची वाट लागली. या रस्त्याचे बांधकाम दोन कंत्राटदारांनी पूर्ण केले. या रस्त्यावर अंदाजे ५५ लाखांचा निधी खर्ची घालण्यात आला. तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने डागडुजी केली. ही डागडुजीही उखडली. नगरपालिकेच्या १९ मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत पॉइंट ऑफ ऑर्डर सादर केला. संबंधितांनी आश्वासन दिले. पुढे कंत्राटदाराने अर्धा रस्ता दुरुस्त करून दिला आणि दुसऱ्या कंत्राटदाराने अर्धा रस्ता दुरुस्त न करता जैसे थे सोडून दिला. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणीही माजी नगराध्यक्ष कुत्तरमारे यांनी केली आहे.