पाणीदार हिवरा गावासाठी सरसावले शेकडो हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:45 PM2018-04-19T22:45:10+5:302018-04-19T22:45:10+5:30
तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : तालुक्यातील हिवरा या गावाने पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. श्रमदानातून हिवरा गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी युवक-युवतींसह शेकडो हात सरसावले आहेत. आर्वी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दादाराव केचे यांनीही हिवरा या गावाला सदिच्छा भेट देत श्रमदान केले. यामुळे श्रमदान करणाऱ्या हातांना बळ मिळाले आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही वॉटर कप आर्वी विधानसभा मतदार संघातील गावाला मिळावा म्हणून भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रमदानासह तांत्रिक माहिती घेऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी स्पर्धेसाठी सज्ज झालेल्या गावांना यथोचित सहकार्य करण्याचे निर्देश केचे यांनी दिलेत. वॉटर कप स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेने गाव एकसंघ झालेले पाहायला मिळाल्याचे म्हटले होते. ते तंतोतंत खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. यंदा या स्पर्धेत तब्बल ७५ तालुके सहभागी झाले आहेत. मागील वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आर्वी तालुक्यातील काकडदरा या गावाने पटकाविला आहे. यामुळे हा कप टिकवून ठेवण्यासाठी जबाबदारी यंदा वाढली आहे, असेही दादाराव केचे यांनी सांगितले.
हिवरा येथील श्रमदानाला माजी आमदार दादाराव केचे यांच्या सोबत भाजयुमो आर्वी तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, पं.स. सदस्य हनुमंत चरडे, वाढोणाचे सरपंच अतुल खोडे, नेरी मिर्झापूरचे उपसरपंच बाळा सोनटक्के, राजू उर्फ सचिंद्र कदम, अश्विन शेंडे, मनीष उभाड, मनोज कसर, राजाभाऊ वानखेडे, प्रमोद विसेकर यांच्यासह हिवरा येथील नागरिक उपस्थित होते.
राज्याच्या २४ जिल्ह्यांत ७५ तालुक्यांत स्पर्धा
यंदा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी १० लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. या पद्धतीने स्पर्धेत विजेत्या गावांना मिळणारी पारितोषिकांची एकूण रक्कम जवळपास १० कोटी रुपये राहणार आहे. यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांपर्यंत विस्तारली गेली आहे.