शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव करून लय भारी स्टिकरच घेणार
By admin | Published: September 17, 2016 02:25 AM2016-09-17T02:25:47+5:302016-09-17T02:25:47+5:30
हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी गावागावात गृहभेटी करून जनजागृती सुरू आहे. यासाठी शाळकरी लहान मुलांना
गटविकास अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : माणिकवाडा विद्यालयातील चिमुकल्यांनी व्यक्त केला निर्धार
आष्टी (शहीद): हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी गावागावात गृहभेटी करून जनजागृती सुरू आहे. यासाठी शाळकरी लहान मुलांना शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळेच चिमुकल्यांनी माणिकवाडा गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून लय भारी स्टिकर घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
माणिकवाडा गावात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या ७० टक्के होती. गावात बोटावर मोजण्याइतके शौचालय होते. शासनाची अनुदान योजना असतानाही गावकरी बांधकामास नकार देत होते. यावर उपाय म्हणून पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी गावाला वारंवार भेट देवून गावकऱ्यांना विश्वासात घेवून त्याचे महत्त्व पटवून दिले. कुटुंबप्रमुखाला आग्रही करण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थी व शाळकरी चिमुकल्यांना जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी गावंडे यांनी जिल्हा स्तरावरील पथकाला विद्यालयात नेले. जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी शालीक मेश्राम, विस्तार अधिकारी कैलास वानखेडे, विस्तार अधिकारी पी.एस. चव्हाण, जिल्हा समन्वयक सचिन खाडे, पंचायत समिती सभापती अर्चना राहाटे, सरपंच तारा खवशे यांच्या उपस्थितीत माणिकवाडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शपथ घेवून शौचालय बांधकामाला सुरुवात करणार असल्याचे ठरविले.
विशेष म्हणजे अपंग कुटुंंबप्रमुख शौचालयाची गरज असताना बांधकामास नकार देत होते. त्यांच्या घरी गटविकास अधिकारी अनिल गावंडे यांनी भेट देवून मतपरिवर्तन केले. यानंतर सहाही घरी बांधकाम सुरू करण्यात आले आहे. माणिकवाडा गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचा मानस गावंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. शौचालय बांधकाम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी घरोघरी दैनंदिन आढावा घेण्याचे काम सुरू आहे. ग्रामसेवक प्रियंका राऊत यांनीही तात्काळ शौचालय बांधकाम अनुदान देणे सुरू केले आहे. सद्यस्थितीत आष्टी तालुक्यातील एकूण ३३ गावे हागणदारीमुक्त झाली आहे. उर्वरीत आठ गावे सुध्दा लवकरच मुक्त होण्यासाठी बिडीओ गावंडे गावागावात सभा घेवूना गृहभेटी देत आहेत. त्यांच्या उपक्रमाला गावकऱ्यांची साथ मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)