शिकारीचा प्रयत्न फसला अन् बिबट्या विहिरीत पडला, सारंपुरी शिवारातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:23 PM2023-03-29T12:23:06+5:302023-03-29T12:23:51+5:30
दोन तासानंतर सुखरूप काढले बाहेर
आर्वी (वर्धा) : शिकारीचा पाठलाग करीत असताना बिबट शेतशिवारातील खोल विहिरीत पडला. याची माहिती शेतमालकाला होताच त्यांनी लगेच वनविभागाला कळविले. त्यानंतर दोनतास रेस्क्यू राबवून बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.
आर्वी वनपरिक्षेत्रातील सारंगपुरी शिवारात साहेबराव दुधे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शेतमालकाला मिळाली. दुधे यांनी शेतशिवार गाठून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. माहिती मिळताच वनविभागाचे एन. एस. जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. साधारणत: ४० ते ४५ फूट विहीर खोल असल्याने बिबट्या बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते. त्याचे योग्य नियोजन करून खाटेला दोरी बांधून विहिरीत सोडण्यात आली.
दोन तासांच्या थरारानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. यात वनपरिक्षेत्र अधिकारी एन. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनात पी. एम. तंबाखे, क्षेत्रसहायक एस. डी. भेंडे, व्ही. आर. आडे, सी.पी. निघोट, जी. एम. धामंदे, डी. एम. दुर्वे, जे. बी. शेख, एस. बी. भालेराव, डी. जी. भोसले यांच्यासह संरक्षक सामाजिक वनीकरण, येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विहिरीतून बाहेर काढल्याबरोबर बिबट्या जंगलात पसार झाला.