चक्रीवादळाचा तडाखा
By Admin | Published: May 7, 2016 02:06 AM2016-05-07T02:06:28+5:302016-05-07T02:06:28+5:30
तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे),
अवकाळी पावसाचा कहर : आर्वी, वर्धा, वायगाव येथे नुकसान
देवळी : तालुक्यातील काही गावांना चक्री वादळाचा गुरूवारी चांगलाच तडाखा बसला. यामध्ये पिंपळगाव (लुटे), खर्डा, बोपापूर वाणी, रत्नापूर, हुस्रापूर, भिडी, ईसापूर, देवळी व परिसरातील गावात झाडे उन्मळून पडली. घरावरील छप्पर उडाले, विद्युत पोल खाली पडून तारा विखुरल्या. काही मिनिटांच्या अवधीतच या वादळाने हाहाकार माजविला.
पिंपळगाव (लुटे) येथील स्वस्त धान्य दुकानदार भास्कर गायकवाड यांच्या अंगावर शेतातील गोठ्याच्या टिना व दगड पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच गावातील शेषनारायण काठोके यांच्या शेतातील गोठा बैलाचे अंगावर पडल्याने एक बैल जखमी झाला. हुस्रापूर येथे चंद्रभान वड्डे यांच्या घरावर चिंचेचे झाड उन्मळून पडले. खर्डा येथील हिरामन शिवरकर व शंकर गावंडे यांच्या घराचे टिनाचे छप्पर उडाले. गावातील अनेकांचे यामध्ये नुकसान झाले.
रत्नापूरचे सरपंच अयुबअली पटेल यांच्या गोठ्याचे छप्पर उडाले. बोपापूर वाणी येथे माणिक कोंबे व अमर अंबरकर यांच्या घराचे व गोठ्याचे छप्पर उडाले. अनेकांच्या घराच्या टिना उडून नुकसान झाले. अनेक गावातील विद्युत पोल उन्मळून पडल्यामुळे कोळोख पसरला आहे. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तहसीलदार तेजस्वीनी जाधव व सहकारी अधिकाऱ्यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
दोन तास विद्युत पुरवठा ठप्प
हिंगणघाट- तालुक्यात विजेच्या कडकडाटासह सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ३० घराचे अंशत: व एका घराचे पुर्णत: नुकसान झाले. यात जवळपास ४ लाखांच्या नुकसानीचा अंदाज महसूल विभागाने वर्तविला आहे. जवळपास एकतास झालेल्या या पावसाची १९.२ मि.ली. नोंद झाली आहे. जवळपास सर्वच ठिकणाचा वीज पुरवठा दोन तास खंडित होता.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या आकस्मिक आगमनाने अनेकांची तारांबळ उडाली. या वादळी पावसामुळे अनेक गावातील मोठमोठी वृक्ष कोलमडून पडली. अल्लीपूरात झाड कोसळून एका घराचे पूर्णत: नुकसान झाले. येणोरा येथे एक, पारडी एक, हिंगणघाट आठ, भगवा एक, नुरापूर तीन, दोंदुडा सात, गंगापूर तीन, खापरी तीन घरे, बोरखेडी येथे एक गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. तर सोनेगाव (धोटे) येथे एका घरावर झाड कोसळून एका घराचे अंशत: नुकसान झाले. सदर वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती नायब तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली. या वादळी पावसाने कोणतीही जीवहानी झाली नाही. शहरात आजही ढगाळ वातावरण कायम आहे.
गिरड परिसराला वादळी पावसाचा तडाखा
गिरड - गुरूवारी सायंकाळी गिरड व आसपासच्या परिसराला वादळी वारे व पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. यामध्ये अनेकांच्या घरावरील टिना, छपरे उडून गेली. तसेच सायंकाळपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. येथील भाऊराव तेलरांधे यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम येथील कन्या विद्यालयाच्या मैदानावर होता. त्यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता. परंतु वादळाने हा संपूर्ण मंडप उडून गेला. यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.