अज्ञात वाहनाच्या धडकेत पती-पती ठार
By admin | Published: June 5, 2017 01:01 AM2017-06-05T01:01:46+5:302017-06-05T01:01:46+5:30
येथील धाम नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली.
पवनार येथील धाम नदीच्या पुलावरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येथील धाम नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पती-पत्नी ठार झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत ठार झालेले दाम्पत्य महाबळा येथील असून विनोद पाटील व कल्पना पाटील अशी त्यांची नावे असल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्रानुसार, महाबळा येथील विनोद पाटील (५०) व त्यांची पत्नी कल्पला हे दोघे एमएच ३२ एल ५५८७ ने महाबळा येथे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. दोघांना धडक देवून अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळाहून पळ काढला.
अपघातची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या अपघातातील मृतदेह रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत पडून असल्याने दुतर्फा वाहतूक खोळंबली होती. यावेळी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह उचलत वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. या कामाकरिता त्यांना येथून प्रवास करणाऱ्या सचीन भिसे आणि सुरज पांडे नामक युवकांनी मदत केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहन चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही.
रानडुकराची धडक; एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : वडनेर येथे दुचाकीने जात असलेल्या इसमाला रानडुकराने धडक दिली. यात सेलू तालुक्यातील बाभुळगाव येथील प्रमोद लाडवे (५९) यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली. बेबी लाडवे (३७) व मुलगी सायली लाडवे (१७) अशी जखमींची नावे आहेत. प्रमोद लाडवे हे एमएच ३१ बीएक्स ३८९८ क्रमांकाच्या दुचाकीने अल्लीपूर मार्गे वडनेर येथे जात होते. दरम्यान पवनी शिवारात रानडुकराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तिघेही पडल्याने प्रमोद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांनी पत्नी बेबी व मुलगी सायली जखमी झाले. त्यांना अल्लीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने परिचारीकेकडून त्यांच्यावर उपचार करावा लागला.