पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:18+5:30
गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. सोबतच दोन्ही मुलांनाही मारहाण करीत. वडीलांच्या या त्रासाला कंटाळून दोन्ही मुले घरसोडून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे मृत पद्मा व आरोपी गणपत हे पती-पत्नीच घरी असायचे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म कारावास आणि १ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्वाळा तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश नरेश सातपुते यांनी दिला.
गणपत गोविंद नेहारे (४८) रा. मायबाई वॉर्ड, आर्वी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची पत्नी पद्मा यांना दोन मुले व एक मुलगी आहेत. आरोपी हा गुरु चारण्याचे काम करतो. तर मृत ही घरोघरी भांडी घासण्याचे काम करायची. आरोपी गणपत हा नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचा. सोबतच दोन्ही मुलांनाही मारहाण करीत. वडीलांच्या या त्रासाला कंटाळून दोन्ही मुले घरसोडून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे मृत पद्मा व आरोपी गणपत हे पती-पत्नीच घरी असायचे. २९ जानेवारी २०१७ ला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आरोपीने मुलाची भेट घेऊन तुझ्या आईला मारुन टाकले, तु घरी जाऊन पहा, असे सांगताच मुलगा राजेंद्र घरी गेला असता त्याला आई घरात निपचित पडलेली दिसली.
तसेच तिच्या अंगावर जखमा दिसून आल्या तर चुलीमध्ये रक्ताने माखलेली काठी जळताना दिसली. तो घराबाहेर आला असता शेजाऱ्यानी तुझ्या बापानेच आईला जबर मारहाण केल्याचे सांगितले.
त्यामुळे राजेंद्र याने आर्वी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन आजुबाजुच्यांचे बयाण नोंदविले. तसेच घटनास्थळावरुन रक्ताने माखलेली काठी, कापडे जप्त केले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास कानडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने ११ साक्षीदारांची साक्ष आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे आरोपी गणपत नेहारे याला तदर्थ जिल्हा न्यायाधीश व अति सत्र न्यायाधीश नरेश सातपुते यांनी ही शिक्षा सुनावली.
सरकारतर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून आर्वी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार अजय खांडरे यांनी कामगिरी बजावली.