पशुधनाची ओळख आता ‘नंबर’ने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:58 AM2017-09-28T00:58:59+5:302017-09-28T00:59:24+5:30
केंद्र शासनाने आधार नोंदणी उपक्रम हाती घेऊन प्रत्येक नागरिकाला ‘नंबर’ने नवी ओळख दिली. याच पार्श्वभूमीवर शासनाने सध्या बारा आकडी युनिट कोडचे टॅग जिल्ह्यातील पशुधनाला लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्र शासनाने आधार नोंदणी उपक्रम हाती घेऊन प्रत्येक नागरिकाला ‘नंबर’ने नवी ओळख दिली. याच पार्श्वभूमीवर शासनाने सध्या बारा आकडी युनिट कोडचे टॅग जिल्ह्यातील पशुधनाला लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून टॅगच्या माध्यमातून प्रत्येक जनावराची इत्यंभूत माहिती आधार सारखीच सहज उपलब्ध होणार आहे. दोन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
जनावरांची ओळख पटावी व त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे या उद्देशाने पशुसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. यात आधारप्रमाणे बारा आकडी युनिक कोडचा टॅग जनावरांना लावण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांची ओळख आता बारा आकडी कोड राहणार आहे. टॅग लावण्याचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार असून पहिल्या टप्प्याचे काम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात दुधाळ जनावरे असलेल्या गाई-म्हशींचा समावेश आहे. तर दुसºया टप्प्यात शेळी आदी उर्वरित सर्व पशुधनाला टॅग लावण्यात येणार आहे.
युनिक टॅग असल्यावरच होईल जनावरांची खरेदी-विक्री
पशुसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पशुधनाला टॅग लावण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनावरांची ओळख सहज पटविता येणार आहे. त्यांच्या संख्येची माहितीही पशुसंवर्धन विभागाला या द्वारे मिळणार आहे. लावण्यात येणारे टॅग जनावरांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पशुपालकाला उपयुक्त ठरणार आहे. सदर टॅग असलेल्या जनावरांचीच यापूढे खरेदी-विक्री होणार आहे.
९५० जनावरांना लावले टॅग
सदर उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दुधाळ जनावरांना टॅग लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यंदाच्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान आतापर्यंत ९५० गाई व म्हशींना टॅग लावण्यात आले आहे. त्यापैकी २६८ जनावरांची माहिती आॅन लाईन प्रणालीवर नोंदविण्यात आली आहे. यामुळे सदर जनावरांची इत्तमभूत माहिती आॅन लाईन उपलब्ध होणार आहे.