शांतीभूमीत रंगलीय साहित्यिकांची वैचारिक दंगल; विद्रोहींचाही वाजता बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2023 07:45 PM2023-02-04T19:45:33+5:302023-02-04T19:45:59+5:30

Wardha News शुक्रवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचेही थाटात उद्घाटन झाले.

Ideological Riot of Color Literary in Shanti Bhoomi; Bugle of rebels too Sahitya Samelan Wardha | शांतीभूमीत रंगलीय साहित्यिकांची वैचारिक दंगल; विद्रोहींचाही वाजता बिगूल

शांतीभूमीत रंगलीय साहित्यिकांची वैचारिक दंगल; विद्रोहींचाही वाजता बिगूल

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रतीकात्मक मानवी मेंदूच्या बेड्या तोडून अनोखे उद्घाटन

कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरी (वर्धा) : या शांती-अहिंसेच्या भूमीमध्ये एकाचवेळी ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत असल्याने साहित्यिकांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवारी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचेही थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने या साहित्यनगरीत वैचारिक दंगल सुरू झाली.

१७ व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघालेल्या विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रेने झाली. ही विचारयात्रा कर्मयोगी सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्यनगरीत दाखल झाल्यानंतर संमेलनस्थळावरील विविध प्रवेशद्वार, प्रदर्शनांचे व ग्रंथनगरीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे, स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे, राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, उद्घाटक रसिका आगासे-अय्युम, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, मावळते अध्यक्ष गणेश विसपुते, डॉ. अंजूम कादरी, शैलेश नवडे, निरंजन टकले, दिलीप घावडे, सुभाष खंडारे, ज्ञानेश वाकूडकर आदी विचारपीठावर विराजमान झाले होते. प्रारंभी नंदुरबार येथील कलावृंदांनी महात्मा फुले रचित ‘सत्याचे अखंड’चे गायन, धुळे येथील अमृत भिल्ल व त्यांच्या संचाने पावरी वादन केले. यानंतर यशवंत महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदन मानसाला’ हे गीत सादर केले. सुधीर गिऱ्हेलिखित ‘विद्रोही...विद्रोही...विद्रोही’ या संमेलन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सूतमाळ, शाला व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यानंतर या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन करण्यात आले. मानवी मेंदू काहींच्या अतिक्रमणामुळे कुलूपबंद झाला आहे. त्यामुळे या प्रतीकात्मक मेंदूच्या साखळदंडाचे कुलूप उघडून त्याला मोकळे करण्यात आले. या अनोख्या उद्घाटनाची सभामंडपात चांगलीच चर्चा राहिली. या संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. अशोक चोपडे यांनी करून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी हे संमेलन घेतले जात असून यातून कोणाचा द्वेश नाही, कुणाशी स्पर्धा नाही तर हे विचारांचे संमेलन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वयाच्या ७८ व्या वर्षानिमित्ताने संमेलनाकरिता ७८ हजारांची मदत करणारे प्राचार्य जनार्दन देवताळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन वनश्री वनकर यांनी केले. आभार गुणवंत डकरे यांनी मानले.

 

संविधान कायम ठेवण्यासाठी लढा : प्रा. नितेश कराळे

या भूमीने देवीदास सोटेंसारखे वऱ्हाडी कवी दिले. महात्मा फुलेंच्या चरित्रावर पहिले पुस्तक वर्ध्यात प्रकाशित झाले. गांधी-आंबेडकरांची भेट येथे झाली. बहुजनांकरिता सर्वांत आधी खुले होणारे लक्ष्मीनारायण मंदिर येथे आहे, तर ब्राह्मणेतर पाक्षिक चालविणारे व्यंकटराव गोडे वर्ध्यातील आहेत. त्यामुळे ही ऐतिहासिक भूमी आहे. या भूमीत विद्रोही साहित्य संमेलन होत असल्याने आपण विद्रोही भूमिका घेतलीच पाहिजे. सामान्यांना दडपण्याचे, आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे आपण आपल्या संविधानाला कायम ठेवण्याकरिता विद्रोह केला पाहिजे, असे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. नितेश कराळे यांनी केले.

पांढरं सोनं पिकविणारी भूमी; पण येथेच सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रा. प्रतिमा परदेशी

विदर्भ ही पांढरं सोनं पिकविणारी भूमी आहे; परंतु सर्वाधिक शेतकरी आत्महत्या येथेच झाल्या, हे मनाला भिडणारं वास्तव आहे. त्यामुळे आपल्याला छळणारी व्यवस्था बदलण्यासाठी विद्रोही भूमिका गरजेची आहे. १९ व्या शतकात सत्यशोधक समाजाचे बीजारोपण झाले असून त्याचा वटवृक्ष बहरत आहे. ज्यांचे स्वातंत्र्यचळवळीत तीळमात्र योगदान नाही, ते आता स्वातंत्र्याच्या बाता हाकत आहेत. संमेलनामध्ये साहित्यिकांना पैसे मोजावे लागत असतील तर ते संमेलन म्हणावे की शेअरबाजार, असा प्रश्नही राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केला.

 

सरकार आता घरातही डोकावयाला लागले : रसिका आगासे-अय्युम

सरकार आता आमच्या घरातही डोकावयाला लागले असून राहणीमान, खानपान आणि कपड्यावरही आक्षेप घ्यायला लागले आहे. आम्हाला १८ व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला तेव्हाच आम्ही या देशाचे सुज्ञ नागरिक झालोत, याचा विसर कदाचित त्यांना पडला असावा. या सरकारकडून लव्ह जिहादचा आडोसा घेत आंतरधर्मीय विवाह थांबविण्याचा प्रयत्न होत आहे. द्वेश करणं सोपं आहे, प्रेम करणं आणि ते टिकवणं फार कठीण असतं, असे मत उद्घाटक रसिका आगासे-अय्युम यांनी व्यक्त केले.

ही तर ‘द ग्रेट इंडियन साहित्यिक सर्कस’ : गणेश विसपुते

मानवी सभ्यतेवर अरिष्ट आले असून त्यात सर्वांचीच होरपळ होत आहे. एखादा साहित्यिक शासनविरोधी भूमिका मांडणार म्हणून त्याचे संमेलनाचे अध्यक्षपदच रद्द केले जाते. त्यामुळे अ.भा. संमेलनावर बोटं उचलली जातात. पूर्वी मराठी साहित्य संमेलन, नंतर महाराष्ट्र साहित्य संमेलन आणि त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, असा हा प्रवास राहिला आहे. केवळ रेल्वेच्या तिकिटासाठी हा बदल झाल्याने सध्या हे संमेलन म्हणजे ‘द ग्रेट इंडियन साहित्यिक सर्कस झालं आहे’ असे मत मावळते अध्यक्ष गणेश विसपुते यांनी मांडले.

------------------------------------------------------

Web Title: Ideological Riot of Color Literary in Shanti Bhoomi; Bugle of rebels too Sahitya Samelan Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.