काँग्रेसची विचारधाराच पक्षाचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:18 AM2018-04-07T00:18:50+5:302018-04-07T00:18:50+5:30
काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता टोकस यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ, वर्धा यांच्यावतीने केळझर येथील सिद्धीविनायक देवस्थानात ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शेखर शेडे, सिंदी (रे.) कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे, ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचे महासचिव गंगाधर पाटील, समितीचे सदस्य हाजी युसूफ शेख, माजी जिल्हा परिषद सभापती लक्ष्मण कांबळे हे उपस्थित होते.
सिद्धीविनायकाचे दर्शन घेवून बैठकीला प्रारंभ झाला. यावेळी अॅड. चारूलता टोकस यांनी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. बैठकीला संबोधताना अॅड. टोकस म्हणाल्या की, देशामध्ये व राज्यामध्ये सत्ताधिकाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य यांच्या अडचणीमध्ये वाढच केली आहे. महागाई, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असताना हे सरकार समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करीत आहेत; मात्र काँग्रेस पक्ष सातत्याने गोरगरीब व शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहील.
यावेळी शेखर शेंडे यांनीही गटतट बाजूला सारून सर्वांनी एकत्र होवून काँग्रेस पक्षाला जिल्ह्यामध्ये गतवैभव मिळवून देण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले. महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुरेश इरूटकर यांनी केले तर संचालन श्रावण तेलरांधे यांनी केले. आभार प्रवीण इरूटकर यांनी मानले. या बैठकीला केळझर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.