निरूपयोगी मूर्ती रस्त्याच्या कडेला
By admin | Published: September 14, 2016 12:48 AM2016-09-14T00:48:52+5:302016-09-14T00:48:52+5:30
प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही.
प्लास्टर आॅफ पॅरिसचा खच : कचऱ्यातील मूर्र्तींची विल्हेवाट लावण्याची मागणी
वर्धा : प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या गणरायाच्या मूर्ती पाण्यात विरघळत नाही. त्यांची होणारी दुरवस्था मानवी काळजाला ठेच पोहोचविणारी आहे. वर्धेतील कुंभार समाजाने प्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर करून मूर्ती तयार केल्या नाही. यामुळे आणि इतर काही कारणांणी निरूपयोगी ठरलेल्या मूर्तींची विल्हेवाट लावण्याकरिता त्या रस्त्याच्या कडेला कचऱ्यात नेऊन टाकण्यात आल्या. यामुळे भाविकांत संतापाची लाट उसळली आहे.
सिंदी (मेघे) येथील कुंभारपुऱ्यात सर्व देवी-देवतांच्या मूर्तींची सुबक पद्धतीने निर्मिती करण्यात येते. काही घरांमध्ये मातीपासून तर काहींकडे प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्त्यांची निर्मिती केली जाते. विकल्या गेलेल्या मूर्ती घरीच सुरक्षितरित्या ठेवल्या जातात. त्यांचीही तुटफूट झाली असेल तर योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे काही वर्षांपूर्वी पाहावयास मिळत होते. आता मात्र मातीच्या मूर्तींची निर्मिती कमी आणि पीओपीच्या मूर्तींची निर्मितीच अधिक होत असल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. गणेश स्थापनेपूर्वी सर्र्वांच्याच घरी पीओपीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. ज्या मूर्ती योग्य पद्धतीने साचातून बाहेर निघाल्या, त्यांची रंगरंगोटी करण्यात आली; पण ज्या मूर्तींमध्ये बिघाड वा इतर काही बाबींची कमतरता आढळली, त्या मूर्तींची रंगरंगोटी न करता त्या अडगळीत ठेवण्यात आल्या.
गणेश उत्सवाला प्रारंभ झाला. मूर्त्यांची विक्री आटोपली. आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरू करावयाची असल्याने मूर्तींची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये गणरायाच्या निरूपयोगी मूर्ती बाहेर काढण्यात आलया आहेत. या मूर्तींची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नागठाणा गावाकडे जाणाऱ्या मार्गाच्या कडेला या तुटलेल्या मूर्ती नेऊन कचऱ्यात टाकण्यात आल्या आहेत. नागठाणा मार्गावरील पंचमुखी हनुमान मंदिरापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला तुटलेल्या मूर्तींचा मोठा ढिग पडलेला आहे. शनिवारी सकाळी हा ढिग काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यावेळी अनेकांनी तेथे थांबून त्या मूर्तींची पाहणी करीत ही देवी-देवतांची विडंबणा असल्याचे म्हणत फेकणाऱ्यांविरूद्ध रोष व्यक्त केला. अत्यंत गलिच्छता असलेल्या ठिकाणावर या मूर्ती टाकण्यात आल्याने भाविक दुखावले आहेत. एकीकडे भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे त्याच गणरायाच्या मूर्ती भग्नावस्थेत कचऱ्यात पडून असल्याचे दु:ख व्यक्त होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या मूर्तींचा ढीग उचलून त्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)