शेळी पालन व्यवसायासाठी जिल्हा ठरणार ‘आयडल’
By admin | Published: May 11, 2017 12:40 AM2017-05-11T00:40:16+5:302017-05-11T00:40:16+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विविध विशेष उपक्रम राबवून शेतीला पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देत
बाजारपेठ उपलब्ध होणार : बेरोजगारांना रोजगाराची संधी
महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विविध विशेष उपक्रम राबवून शेतीला पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शासनाच्यावतीने केले जात आहे. याच उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने एक नवीन उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेळी पालकांना एकत्रित करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिणामी, ग्रामीण भागातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात जवळपास १ लाख ६० हजार शेळी आहेत. तसेच शेळीपालकांची संख्याही बऱ्यापैकी आहे; पण सदर शेळी पालकांना जिल्ह्यातच पाहिजे तशी मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णा तसेच अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी विकण्याकरिता जावे लागते. शेळी पालकांना जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना शास्वत दर मिळावा, शेळीपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मागणीनुसार ‘शेळींचा आठवडी बाजार’ या नावाचा विशेष आराखडा जि.प. पशुसंवर्धन विभागाने तयार केला आहे. सदर प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ना. जानकर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या आराखड्यात शेळींचा सुसज्य आठवडी बाजार, शेळी प्रजनन केंद्र व पशुविज्ञान केंद्राचा समावेश आहे. सदर प्रस्ताव पुर्णत्त्वास आल्यानंतर जिल्हा शेळीपालन व्यवसायासाठी ‘आयडल’ ठरणार आहे.
एक हजार शेळीपालकांना करायचे आहे एकत्रित
जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वरिष्ठांचे सहकार्य घेत आतापर्यंत २५ ते ३० शेळीपालकांना एकत्रित करून तालुकास्तरीय गट तयार करून २५० शेळी पालकांना एकत्रित करण्यात यश आले आहे. एकूण एक हजार शेळी पालकांना एकत्रित करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गटही तयार करण्यात येणार आहे.
देवळी व सालोड (हि.) चा विचार सुरू
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या शेळींच्या आठवडी बाजारासाठी अद्यापही जागा निश्चित करण्यात आली नसली तरी वर्धा शहरानजीकच्या सालोड (हिरापूर) व देवळी येथे सदर आठवडी बाजार तयार करण्याचे विचाराधिन आहे. जागा निश्चित झाल्यानंतर तेथे शेळींचा आठवडी बाजार, पशु विज्ञान केंद्र व शेळी प्रजनन केंद्र तयार करण्यात येणार आहे.
सदर उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. शेळी पालकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळताच काम सुरू करण्यात येणार असून वर्धा जिल्हा आयडल ठरणार आहे.
- डॉ. सतीश राजू, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.
ग्रामीण बेरोजगारांना देणार प्रशिक्षण
जिल्ह्यात बेरारी प्रजातीची शेळी मोठ्या प्रमाणात आहे. बेरारी, उस्मानाबादी, शिरोही, जमना पाटी, ब्लॅक बॅन्गॉल बारवेरी या शेळींच्या प्रजाती आहेत. तयार करण्यात येणाऱ्या शेळी प्रजनन केंद्रात जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने शेळीपालकांची भटकंती होऊ नये म्हणून विविध प्रजातीचे बोकड ठेवण्यात येणार आहे. जागेची निवड झाल्यानंतर तयार करण्यात येणाऱ्या मोठ्या बाजारपेठेमुळे शेळीपालकांना शास्वत दर मिळणार आहे. पशु विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगारांना शेळीपालन व्यवसायाबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शाश्वत दर मिळणार
शेळीपालनाचा व्यवसाय करणारे जिल्ह्यात बऱ्यापैकी असून सध्या जिल्ह्यातील शेळी पालकांना १५० रुपये प्रती किलो प्रमाणे दर मिळतो. तोच दर मोठ्या बाजारपेठेत २१० रुपये प्रती किलोच्या घरात जातो. जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेळीपालकांचा मोठ्या बाजारपेठेपर्यंत जाण्याचा त्रास कमी होणार असून त्यांना शास्वत दर मिळणार आहे.