मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:52 PM2018-05-24T23:52:15+5:302018-05-24T23:52:15+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुख्याधिकारी दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : स्थानिक नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मुख्याधिकारी दंडवते यांच्या कथित अन्याय धोरणाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. माजी नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाच दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी संतप्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामगार पुढारी व नगर सेवकांनी दंडवते यांच्याशी दोन तास चर्चा केली; पण कर्मचारी व प्रशासन यांच्यात एकाही मागणीवर एकमत झाले नाही. शेवटी कर्मचारी संघटनेद्वारे अॅड. कोठारी यांनी पाच दिवसांत ाागण्या मान्य न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आज न.प. कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कोणतीही पूर्व सूचना न देता स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांना निलंबित करणे, तांत्रिक पदावर अतांत्रिक कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचे प्रकार बंद करावे. २५ वर्षांपासून विविध विभागात लिपिक, शिपाई पदावर अतिरिक्त मोबदला न घेता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाच्या कामावर पाठवून त्यांना दुय्यम दर्जाची कामे देण्यात आली. अशा कर्मचाऱ्यांना पूर्व पदावर घेण्यात यावे. रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार फेब्रुवारी २०१८ पर्यंत १४ महिन्यांचा किमान वेतन वाढीव मोबदला ११८ रुपये प्रतिदिवसप्रमाणे देण्यात यावा. शासन निर्णयानुसर १ जानेवारी २०१८ पासून सुधारित किमान वेतन वाढीव दर त्वरित लागू करावा. निवृत्त स्थायी, अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवा उपदानाची एकमुस्त रक्कम द्यावी. भविष्य निर्वाह निधी दंडाची थकित रक्कम भरणा करावी. २७ आॅक्टोबर २०१६ पासून सफाई कामगारांना कामाचा मोबदला देऊन शासकीय सुट्यांचा लाभ द्या, रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा प्रस्ताव अडीच महिन्यांपासून प्रलंबित असून तो त्वरित शासनाकडे पाठवा, लाड, पागे समितीच्या धोरणानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक आधारावर पदोन्नती देऊन अवैध पदोन्नती रद्द आदी मागण्या लावून धरण्यात आल्या. संतप्त कर्मचाऱ्यांनी नारेबाजी करीत न.प. मुख्याधिकाऱ्यांना निषेध केला. यावेळी अॅड. कोठारी तथा माजी न.प. अध्यक्ष सुरेश मुंजेवार, नगरसेवक आफताब खान, नीता धोबे, प्रकाश राऊत, धनंजय बकाने, देवा कुबडे, सुनील डोंगरे यासह कर्मचारी, सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न.प. अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कार्यवाही व बदल्या प्रशासकीय सोयीसाठी गरजेचे असल्याने करण्यात आल्या. ही कार्यवाही नियमानुसार आहे. निवेदनातील मागण्यांबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल.
- मिनीनाथ दंडवते, मुख्याधिकारी, न.प. हिंगणघाट.