परीक्षा पुढे ढकलली की वयही निघून जातं! संतप्त विद्यार्थ्यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:17 PM2021-03-13T12:17:54+5:302021-03-13T12:18:12+5:30

Wardha News महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च २०२१ रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. कोरोनाचे कारण पुढे करून पाचव्यांदा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

If the exam is postponed, the age also goes away! The grief of angry students | परीक्षा पुढे ढकलली की वयही निघून जातं! संतप्त विद्यार्थ्यांची खंत

परीक्षा पुढे ढकलली की वयही निघून जातं! संतप्त विद्यार्थ्यांची खंत

Next
ठळक मुद्देइतर परीक्षा होतात मग एमपीएससी का नाही

 लोकमत न्यूज नेटवर्क 
 

वर्धा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च २०२१ रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. कोरोनाचे कारण पुढे करून पाचव्यांदा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. अखेर शासनाच्या आदेशाने २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, परीक्षा पुढे ढकलली की वयही वाढत जातं. पुन्हा तोच कित्ता गिरवावा लागत असल्याची खंत परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या वेगवेगळ्या सेवांसाठी किंवा पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचे काम करतात. या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आदी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात. राज्यसेवा परीक्षेतील राजपत्रित अधिकारी हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद समजले जाते. ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेतली जाते. त्यात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा निवडीच्या पायऱ्या आहेत. एमपीएससी परीक्षेसाठी १९ वर्षे किमान वयोमर्यादा अपेक्षित असून विविध संवर्गाकरिता व आरक्षित जागांकरिता वेगवेगळी वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यसेवा पूर्वपरिक्षा-२०१९ ही अद्यापही होऊ शकली नाही. वारंवार ती पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त झाले होते. आता १४ मार्च रोजी परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी पूर्ण तयारी केली होती; पण अचानक ११ मार्च रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने करीत शासनाचा निषेधही नोंदविला. वारंवार परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्याने वयही वाढत आहे. परिणामी, शारीरिक, मानसिक, आर्थिक व शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप करीत इतर परीक्षा होऊ शकतात तर एमपीएससी का नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांचा हा आक्रोश पाहून शासनानेही येत्या २१ मार्च रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून सर्व विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली आहे.

इतर परीक्षा होतात एमपीएससीची का नाही?

* इतर परीक्षा होतात, मग एमपीएससीची परीक्षा का नाही, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

* कोरोनामुळे कोणती गोष्ट न थांबवता पूर्ण प्रतिबंधक नियम पाळूनही पुढे जाता येते. त्यासाठी लोकही सहकार्य करतील, असे पालकांचे म्हणणे आहे.

* विद्यार्थ्यांचा विचार न करता अचानक परीक्षा पुढे ढकलणे, ही बाब योग्य नाही. यामुळे काय साध्य झाले? असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे.

परीक्षा रद्द होण्याची ही पाचवी वेळ

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती तर सलग पाचव्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा-२०१९ ची परीक्षा आहे. ती अद्यापही झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष वाया गेले आहे. कोरोनाचे कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने घेतल्यावर राज्यभरात विद्यार्थ्यांनी आक्रोश निर्माण झाला होता; पण आता २१ मार्चला परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परीक्षेसाठी हॉल तिकीट दिले होते

लोकसेवा आयोगासह विद्यार्थ्यांनीही परीक्षेची तयारी पूर्ण केली होती. आयोगाकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले होते. त्यानुसार १४ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेकरिता जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित केले होते. विद्यार्थ्यांनीही हॉल तिकीट काढून मिळालेल्या परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेत पोहोचण्याची तयारी केली होती. अनेकांनी प्रवासाचे तिकीटही बुक केले होते. सर्व तयारी असतानाच परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वी रद्दचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना भुर्दंड सहन करावा लागला. आता पुन्हा २१ मार्चकरिता तिकीट काढावे लागणार आहे.

परीक्षार्थी कोट

वारंवार परीक्षेच्या तारखेत आयोगाने बदल करणे, ही बाब विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडवणारी आहे. सर्व अभ्यास करून आम्ही परीक्षेची तयारी केली. केंद्रावर जाण्यासाठी एसटी, रेल्वेचे तिकीट बुक केले. आता २१ मार्चला परीक्षा होणार आहे. त्यामुळे १४ मार्चसाठी दिलेल्या हॉल तिकिटावरच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार आहे; पण विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तिकिटाचा भार सोसावा लागणार आहे. आता तरी परीक्षेची तारीख बदलायला नको.

-स्वप्नील पाटील

एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलणे हे कितपत योग्य आहे? अनेकदा असे झाल्याने या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरी अशा पद्धतीने अचानक परीक्षा पुढे ढकलून काय उपयोग, यातून काय साध्य होणार आहे! यात आमचे खच्चीकरण होत आहे. परीक्षा देता देता आयुष्य बेकार झालं. त्यातही महाराष्ट्र सरकार वारंवार वेळापत्रक बदलून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत आहे.

-राहुल हिरेखण

दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा परीक्षेच्या दोन-तीन दिवसांपूर्वी परीक्षा पुढे ढकलल्याचे कळते, तेव्हा विद्यार्थ्यांची काय मानसिकता असते हे फक्त विद्यार्थीच समजू शकतात. सरकारने कोरोनाचे कारण देत तब्बल पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना आपण आयुष्यात अधिकारी बनणार की नाही, अशी भीती वाटायला लागली आहे. म्हणून आता तरी कोणतेही कारण न देता २१ मार्चला परीक्षा घ्यावी.

-नमिता भिवगडे

 

-----------------------------------------------

Web Title: If the exam is postponed, the age also goes away! The grief of angry students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा