भाषा मृत पावली तर संस्कृतीही नष्ट होते
By Admin | Published: March 3, 2017 01:51 AM2017-03-03T01:51:14+5:302017-03-03T01:51:14+5:30
प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पु
पुरूषोत्तम कालभूत : जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
वर्धा : प्रमाण भाषा ही तळ्यातल्या पाण्याप्रमाणे आहे तर बोली या झऱ्याप्रमाणे आहेत. बोली ही मराठी भाषेला शब्द पुरवून जिवंत ठेवतात; पण हल्ली बोलीच मृत पावत चालल्या आहेत. जाती-जमातीच्याही बोली नष्ट होताना दिसत आहेत. यामुळे आपण बोली जगविल्या पाहिजेत. बोली भाषा मृत पावल्या तर आपली संस्कृतीही नष्ट होते, असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम कालभूत यांनी केले.
शिक्षा मंडळ वर्धाद्वारा संचालित श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा महाविद्यालयात सोमवारी मराठी विभागाद्वारे कवी कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. सुरेश पवार, मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते.
डॉ. कालभूत पूढे म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी मराठी भाषेचा उदय झाला. मराठी ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या काळात मराठीला सर्वोच्च वैभव प्राप्त झाले होते; पण आता कॉन्व्हेंट संस्कृती फोफावत असल्याने इंग्रजी भाषेचा वापर वाढला आहे. ज्याला इंग्रजी येत नाही, त्याला मागास समजले जाते. यामुळे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. यामुळेच मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल तर आपल्यापासून सुरूवात करा. मराठी बोला आणि बोली जगवा, असे आवाहनही त्यांनी केले.
उपप्राचार्य सुरेश पवार यांनी आपली बोली भाषा बोलताना कोणतीही लाज बाळगू नका. सोबतच मराठी ही मातृभाषा आहे, हेही विसरू नका, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. राजेश देशपांडे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या आयोजना मागची भूमिका विषद केली. यावेळी दिलेश्वरी वर्मा व सारिका तेलगोटे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार प्रा. आनंद इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथपाल डॉ. वैशाली उगले व विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)