आक्षेप ठरला 'कच्चा'; तर सहा महिने तुरुंगवास 'पक्का' ! व्हीव्हीपॅटवर आक्षेप घेताना सावधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 04:30 PM2024-11-18T16:30:24+5:302024-11-18T16:34:27+5:30
Wardha : मतदार बंधूंनी आक्षेप घेताना सावधान ! अन्यथा ते अंगलट येण्याचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : व्हीव्हीपॅट म्हणजे व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल. एखाद्या मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, खरंच त्याच उमेदवाराला मत गेलं की नाही, याची खातरजमा करण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो; मात्र एखाद्या मतदाराने यावर आक्षेप घेतला आणि ते खोटे ठरले तर अशा मतदाराला सहा महिने कारावास आणि १ हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाकडून होऊ शकते. त्यामुळे मतदार बंधूंनी आक्षेप घेताना सावधान ! अन्यथा ते अंगलट येण्याचा धोका नाकारता येत नाही.
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार आहे. त्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता वाढावी आणि ईव्हीएम मशीनबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनातील संशय दूर करण्यासाठी मतदाराने ईव्हीएम मशीनवर त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरचं बटण दाबल्यानंतर त्याचे मत त्याच उमेदवाराला गेले की नाही याची पडताळणी करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येतो.
यात उमेदवाराच्या नावासमोरचं बटण दाबल्यानंतर त्याचवेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप मशीनमध्ये सात सेकंदापर्यंत मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ती स्लीप कट होऊन बीप वाजतो आणि ती स्लीप सीलबंद पेटीत जमा होते; परंतु एखाद्या मतदाराला आपण ज्या उमेदवाराला मतदान केले, त्या उमेदवाराऐवजी वेगळ्याच उमेदवाराची चिठ्ठी मशीनमध्ये दिसली अशी शंका आल्यास असा मतदार आक्षेप घेऊ शकतो. आक्षेप खरा ठरला तर मतदान थांबविले जाते आणि जर आक्षेप खोटा ठरला तर त्या मतदारावर कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहण्याची गरज आहे.
आक्षेप घेणाऱ्याचे दोनदा मतदान
- एकदा मतदान केल्यानंतर मतदाराने आक्षेप घेतल्यास अशा मतदाराकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाईल. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उमेदवाराला चाचणी मत नोंदविण्याची परवानगी देऊन सोबतच चिठ्ठयांचे सर्वांसमोर निरीक्षण केले जाणार आहे.
- अशावेळी आक्षेप खोटा आढळल्यास कलम ४९ एमए अंतर्गत अथवा मतदारांवर सहा महिने तुरुंगवास व एक हजार रुपये दंडाची तरतूद निवडणूक आयोगाने केलेली आहे.