अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित उपचार मिळाल्यास प्राण वाचविता येईल
By admin | Published: January 15, 2017 12:47 AM2017-01-15T00:47:38+5:302017-01-15T00:47:38+5:30
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते.
इंदूरकर : रस्ता सुरक्षा सप्ताह
वर्धा : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसते. अपघात झाल्यास पहिल्या एक ते दोन तासात जर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली तर अनेक लोकांचे प्राण वाचविणे शक्य होईल, असे प्रतिपादन सामान्य रुग्णालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. इंदूरकर यांनी व्यक्त केले.
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विकास भवन येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील आॅटोरिक्षा, स्कूलबस संघटना यांच्यासाठी रस्ता सुरक्षा मेळावा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला सामान्य रूग्णालयाचे प्रभारी शल्य चिकित्सक डॉ. कपील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी.बी. झाडे, वाहतूक उपनिरीक्षक कोडापे, बोराडे, अमोल रघाटाटे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. इंदुरकर म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचविण्यास प्राधान्य देण्यात यावे. अशा जखमींना मदत करणाऱ्या लोकांना पोलीस विभागाकडून चौकशीसाठी बोलविण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर बोलताना डॉ. कपील म्हणाले, रस्ता अपघातामधील ७० टक्के व्यक्ती या डोक्याला मार लागल्यामुळे मृत पावतात. दुचाकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे जीवितहानी निश्चितपणे टाळता येऊ शकेल.
यावेळी बोराडे व अमोल रघाटाटे यांनी कॅशलेस व्यवहाराबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. पी.पी.टी. द्वारे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी, वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सूरज पवार यांनी केले तर पी.बी. झाडे यांनी आभार मानले.(स्थानिक प्रतिनिधी)