ऑनलाईन ‘गेम’ खेळत असाल, तर सावधान; लाखों रुपये होऊ शकतात ‘साफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 PM2021-07-10T16:18:42+5:302021-07-10T16:23:44+5:30
Wardha News जर तुमचा मुलगा घरात ऑनलाईन गेम खेळत असेल, तर पालकांनो आजच सावध राहण्याची गरज आहे. कारण मागील काही दिवसांपासून ऑनलाईन गेमिंगमार्फत बॅंक अकाऊंटमधून पैसे लंपास होण्याचे प्रमाण वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जर तुमचा मुलगा घरात ऑनलाईन गेम खेळत असेल, तर पालकांनो आजच सावध राहण्याची गरज आहे. कारण मागील काही दिवसांपासून ऑनलाईन गेमिंगमार्फत बॅंक अकाऊंटमधून पैसे लंपास होण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर सेलकडे अशा तक्रारी प्राप्त होत असून, नागरिकांनी आता सावध राहण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू असून, शाळा, महाविद्यालये बंद आहेत. केवळ ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याने मुलांचा अधिक वेळ मोबाईलवरच जातो. त्यातच मुले घराबाहेर निघू शकत नसल्याने ते मोबाईलवर ऑनलाईन गेम्स खेळतात. मात्र, याचा फायदा आता सायबर भामटे घेऊ लागले आहेत. ऑनलाईन गेम खेळताना मध्येच एक नोटिफिकेशन येते. त्या नोटिफिकेशनवर काही शस्त्र किंवा इतर साहित्य खरेदी करण्याचे दाखविले जाते. मुलं नोटिफिकेशन न वाचताच त्यावर क्लिक करतात. मग, काय क्षणातच त्यांच्या बॅंक खात्यातून लाखो रुपयांची रक्कम परस्पर लंपास केली जाते. विशेष म्हणजे पैसे कटल्याचा कुठलाही मेसेज मोबाईलवर येत नसल्याने फसवणूक झाल्याचे पालकांना लक्षात येत नाही. बॅंकेत जात चौकशी केल्यावर त्यांना पैसे लंपास झाल्याची माहिती होते. त्यामुळे पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पाल्यांना मोबाईलवर असे ऑनलाईन गेम्स खेळण्यापासून थांबविण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून केले जात आहे.
‘फ्री फायर गेम’ सायबर भामट्यांचा प्लॅटफॉर्म
मोबाईलवर ऑनलाईन खेळला जाणारा ‘फ्री फायर गेम’ सध्या सायबर गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनला आहे. या गेममध्ये हे सायबर गुन्हेगार तुमचे टीम मेंबर बनतात. टीममधील सदस्यांशी मैत्री करतात. विश्वास संपादन केल्यानंतर आपला रंग दाखवायला सुरुवात करतात. थेफ सायकोलॉजीचा वापर करून सुरुवात अश्लील चॅटपासून होते. त्यानंतर हळूहळू ते अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात अडकवतात.
गेम खेळताना माहिती देण्यास टाळावे
ऑनलाईन गेम खेळताना अनेकदा पेमेंट करायचे असते. गेमच्या वेबसाईट आणि ब्राऊजरवर एकदा डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती देताच ती फीड होऊन जाते. दुसऱ्यांदा गेम खेळताना ‘ओके’ करताच आपोआप पैसे कटतात. त्यामुळे गेम खेळताना डेबिट आणि क्रेडिट कार्डाची माहिती न टाकण्याचे आवाहन सायबर सेलतर्फे करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या तक्रारी जास्त
ऑनलाईन गेम खेळल्याने बॅंक खात्यातून परस्पर रक्कम लंपास झाल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. सायबर सेलकडे सात ते आठ तक्रारी प्राप्त झाल्या असून, तक्रारकर्त्यांमध्ये शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांनो सावधान, पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.