टॉसिलीझुमॅब संपले तर फेव्हिपिरॅव्हीर अन् रेमडेसिविरचा साठा नाममात्रच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:00 AM2021-04-24T05:00:00+5:302021-04-24T05:00:02+5:30
कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयातील मुक्काम कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर यांसह इतर औषध उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काही तज्ज्ञ रेमडेसिविर हे प्रभावी नाहीच असे सांगतात. असे असले तरी कोविड-१९ विषाणूचा मुळापासून खात्मा करण्यासाठी अद्यापही कुठलेही प्रभावी औषध शोधण्यात आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना यश मिळालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गंभीर कोविडबाधित वेळीच बरा होऊन घरी जाण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर हे औषध सध्या उपयुक्त ठरत आहे. परंतु, याच औषधांची मागणी वाढल्याने जिल्ह्यात सध्या औषध तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या साडेचार हजारांहून अधिक ॲक्टिव्ह कोविडबाधित असून, टॉसिलिझुमॅबचा एकही व्हायरल जिल्ह्यात नसून फेव्हिपिरॅव्हीर अन् रेमडेसिविरचा नाममात्र साठा असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे या विषयी जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारले असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
कोरोनाग्रस्ताचा रुग्णालयातील मुक्काम कमी करण्यासाठी टॉसिलिझुमॅब, फेव्हिपिरॅव्हीर आणि रेमडेसिविर यांसह इतर औषध उपयुक्त ठरत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काही तज्ज्ञ रेमडेसिविर हे प्रभावी नाहीच असे सांगतात. असे असले तरी कोविड-१९ विषाणूचा मुळापासून खात्मा करण्यासाठी अद्यापही कुठलेही प्रभावी औषध शोधण्यात आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांना यश मिळालेले नाही. असे असले तरी उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करून अनेक कोविड बाधितांना सध्या डॉक्टर बरे करीत आहेत. मागील काही आठवड्यांपासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढली आहे. यामुळे दिवसेंदिवस ॲक्टिव्ह कोविडबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील आयसीयू, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तसेच साधारण रुग्णखाटा फुल्ल झाल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना रुग्णखाट मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे विदारक चित्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कायम असतानाच आता नाममात्र औषध साठाच शिल्लक असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शिवाय, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या विशिष्ट औषधासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंतीच करावी लागत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला वेळीच मुबलक औषधसाठा कसा मिळेल, यासाठी राजकीय पुढाऱ्यांसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
फेव्हीपिरॅव्हीर एक हजार दोनशे, तर रेमडेसिविर दोनशेच
जिल्ह्यात सध्या टॉसिलीझूमॅपही औषध नसून फेव्हीपिरॅव्हीर १ हजार २०० तर रेमडेसिविर २०० असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्याची कोविड परिस्थिती बघता उपलब्ध असलेला हा औषध साठा तोकडाच असल्याचे वास्तव आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांना माहिती देण्याची ॲलर्जी
पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयावर चर्चेचा विषय ठरणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांना एसएमएस द्वारे माहिती देत टॉसिलीझूमॅप, फेव्हीपिरॅव्हीर आणि रेमडेसिविरचा जिल्ह्यात किती साठा आहे याची विचारणा केली असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्ह्याची कोविड परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असताना जिल्हा शल्य चिकित्सक याविषयी गंभीर नाही काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
नातेवाईकांची घालमेल
माझ्या कुटुंबातील महिला सदस्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असल्याने डॉक्टरांनी रुग्णास तातडीने सेवाग्राम किंवा सावंगी येथील रुग्णालयात हलविण्याचे सांगितले. पण या दोन्ही रुग्णालयात रुग्णखाटा फुल्ल असल्याने रुग्णाला घरीच मरु द्यावे काय असा प्रश्न माझ्यासमोर होता. पण एका मित्राने त्याच्या परिचयातील एकाची मदत घेत आमच्या रुग्णालयाला रुग्णालयात दाखल करून घेतल्याचे नाव प्रकाशित करण्याच्या अटीवर रुग्णखाटेसाठी भटकंती होणाऱ्या कोविड बाधिताच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.
वयोवृद्ध वडिलाचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती बघून त्यांना सर्व सुविधा असलेल्या कोविड रुग्णालयात हलविण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. पण जिल्ह्यातील कोविड रुग्णालय फुल्ल असल्याने मी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात वडिलांना दाखल केल्याचे कोविड बाधिताच्या मुलाने लोकमतशी बोलताना सांगितले.
आमचे मामा कोविड पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, त्यांना खोकला खुप वाढल्याने रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रयत्नाअंती बेड मिळाला. बेडसाठी सध्या भटकंती होत आहे.
- सतीश काळे.