वाहने उचलून नेल्यास अधिक दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:13 AM2018-02-07T00:13:02+5:302018-02-07T00:13:57+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेद्वारे विविध प्रकारे कार्यवाही केली जाते. याचा वाहन धारकांना त्रास होत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेद्वारे विविध प्रकारे कार्यवाही केली जाते. याचा वाहन धारकांना त्रास होत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये ठेवलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून उचलून नेली जातात. यात वाहन धारकांवर दंड आकारला जात असून टोर्इंग व्हॅनचा खर्चही वसूल केला जातो. आता या खर्चात आणखी वाढ होणार असल्याचे संकेत वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेने दिले आहेत.
वर्धा शहर वाहतूक नियंत्रक पोलीस शाखेकडे नो पार्किंगमधील वाहने उचलून आणण्याकरिता स्व-मालकीची टोर्इंग व्हॅन नाही. परिणामी, यासाठी भाडेतत्वावर वाहन घेण्यात आले आहे. या वाहन धारकाला दररोज दोन हजार रुपये याप्रमाणे भाडे अदा करावे लागते. वाहतूक पोलिसांकडून उचलून आणलेल्या वाहनांवर २०० रुपये दंडाची कारवाई केली जाते. या व्यतिरिक्त वाहन भाड्यापोटी ५० रुपये वसूल केले जातात. असे २५० रुपये वाहन धारकाकडून वसूल केले जात होते; पण आता अनेक वाहन धारकांना शिस्त लागल्याने वाहतूक पोलिसांना नो पार्किंगमध्ये वाहने मिळत नाहीत. परिणामी, दररोज १५ ते २० वाहनेच पोलिसांच्या हाती लागतात. यात टोर्इंग व्हॅनचा खर्चही निघत नसल्याचे सांगण्यात आले आहे. काही महिन्यांत टोर्इंग व्हॅनचे भाडे पोलीस कर्मचाºयांना द्यावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.
मोठ्या शहरांमध्ये टोर्इंग व्हॅनच्या भाड्यापोटी वसूल करण्यात येणारी रक्कम अधिक आहे. यामुळे तेथील वाहतूक पोलिसांना तो खर्च करणे शक्य होतो. मुंबई येथे दंडाची रक्कम २०० रुपये तथा टोर्इंग व्हॅनचा खर्च २०० रुपये, असा ४०० रुपये दंड दुचाकी, चार चाकी वाहन चालकांना केला जातो. वर्धा शहरात मात्र केवळ ५० रुपये अधिक आकारले जातात. आता टोर्इंग व्हॅनचा खर्चही निघत नसल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन घेण्यात आले. त्यानुसार टोर्इंग व्हॅनच्या खर्चामध्ये २० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आजपर्यंत टोर्इंग व्हॅनद्वारे नो पार्किंगमधील दुचाकी वा चार चाकी वाहन उचलून नेल्यास संबंधित वाहन धारकाला २५० रुपये आकारले जात होते.
आता १० फेबु्रवारीनंतर टोर्इंग व्हॅनद्वारे वाहन उचलून नेल्यास २७० रुपये आकारले जाणार आहेत. यातील २०० रुपये ही दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली जाणार असून ७० रुपये टोर्इंग व्हॅनचे भाडे म्हणून आकारले जाणार आहेत. यामुळे शिस्तीने पार्किंगच्या जागेमध्ये वाहने उभी न केल्यास आता वाहन धारकांना २७० रुपयांच्या दंडाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
बाजार ओळीत पी वन, पी टूचा आधार
शहरात पालिकेच्यावतीने कुठेही पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शहरात अन्यत्र पालिकेकडे तथा महसूल विभागाकडे मोकळ्या जागा असल्या तरी बाजारपेठेमध्ये मात्र फारशी जागा उपलब्ध नाही. यामुळे वाहतूूक पोलिसांनाच त्यावर तोडगा काढावा लागला आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी बाजारपेठेमध्ये पार्किंगसाठी पी वन, पी टू ही योजना आखली होती. यात आठवड्यातील ठराविक दिवशी रस्त्याच्या एका बाजूने तर अन्य ठराविक दिवशी रस्त्याच्या दुसºया बाजूने वाहने उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या व्यवस्थेमुळे रस्त्याची एक बाजू तरी रहदारीसाठी तथा पादचाºयांसाठी उपलब्ध राहते. सध्या ही पद्धत पुन्हा अंमलात आणण्यात आली आहे. या व्यवस्थेचा बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राखण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे.
पार्किंगचे लावले फलक
शहरात वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्सम फलकही त्या-त्या जागेवर लावण्यात आलेत. काही ठिकाणी या फलकांसमोर अतिक्रमण करण्यात आल्याचेही पाहावयास मिळत आहे. असे असले तरी वाहने ठेवायची असल्यास त्या भागातील वाहतूक पोलीस संबंधिंत वाहन धारकांना तेथील जागा मोकळी करून देत असल्याचे पाहावयास मिळते. हा प्रकार बजाज चौकातच अधिक दिसून येतो.