मिल बंद केल्यास रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:06 AM2019-03-30T00:06:53+5:302019-03-30T00:08:09+5:30
येथील १२० वर्षे जुन्या आर. एस. आर. मोहता स्पिनिंग व विव्हिंग मिल्स येथील कामगारांची द्वार सभा शुक्रवारी पार पडली. मिल बंद केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील १२० वर्षे जुन्या आर. एस. आर. मोहता स्पिनिंग व विव्हिंग मिल्स येथील कामगारांची द्वार सभा शुक्रवारी पार पडली. मिल बंद केल्यास प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी कामगारांनी दिला.
कापड उद्योगाने भविष्यात तोट्यात वाढ होत गेल्यास कंपनीचे काही विभाग अर्धे तर काही विभाग पूर्णत: बंद करावे लागतील अशी सूचना प्रसिद्ध केली आहे. या अनपेक्षित सूचनेमुळे कामगार वर्गात रोष निर्माण होत आहे. शिवाय त्यांच्यात खळबळ उडाली असून मिल प्रशासनाने मिल बंद केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी माजी आमदार राजू तिमांडे यांनी दिला. मागील ११ महिन्यांच्या कालावधीत बाजार भावात झालेली घसरण व मालाची मागणी कमी झाल्याने कंपनीला १० कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शिवाय त्याचा आर्थिक भुर्दंडही कंपनीवर पडत आहे. यातून सावरण्यासाठी कामगार वर्गाने उत्स्फूर्तपणे काम करून मालाची गुणवत्ता वाढवून झालेला तोटा कमी करावा, अन्यथा वेळेवर पगार देणे कठीण होण्याची शक्यता वर्तविली आहे. कामगारांनी आपली कामे निष्ठेने करून कंपनीला रोजच्या व्यवहारात सहकार्य करावे, अन्यथा कारवाईचा इशारा कंपनी व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे दिला आहे. या संदर्भात स्थानिक मोहता मिल चौकात शुक्रवारी दुपारी कामगारांची द्वार सभा पार पडली. यावेळी माजी आमदार राजू तिमांडे, नाना हेडावू, दीपक भरदे, प्रवीण चौधरी, गुलाब पिंपळकर, प्रवीण जनबंधु, शकीलभाई, राजू वैरागडे, दिवाकर डफ, योगेश जंगले, प्रभाकर शेंडे अशोक आंबटकर आदींची उपस्थिती होती.