जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:01 PM2024-08-03T17:01:30+5:302024-08-03T17:04:36+5:30
Vardha : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू
वर्धा : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणूक प्रक्रियेत मतदानाद्वारे सहभाग घेतला जातो. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदान करता येते; परंतु यासाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अनेकांकडे १९९४ पासूनचे जुने मतदार ओळखपत्र अजूनही कायम आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता नव्याने ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ओळखपत्रासाठी काय कराल?
नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी सर्वात आधी फॉर्म क्रमांक ६ भरावा लागतो. वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येते. त्याकरिता हा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
नाव नोंदवायचे असेल तर...
वेबसाइट
व्होटर कार्ड काढायचे असेल तर कुठल्या सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत. घरबसल्या ऑनलाइन अर्ज देण्यासाठी voters.eci.gov.in या वेबसाइटवर जावे.
मोबाइल अॅप
निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाइन नावाचे एक मोबाइल अॅप तयार केले आहे. यात व्होटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून प्रक्रियेद्वारे व्होटर आयडी कार्डसाठी अर्ज करता येतो.
कोणकोणती कागदपत्रे आवश्यक ?
व्होटर आयडी कार्डसाठी अर्जासोबत एक पासपोर्ट साईज फोटो, वयाचा आणि पत्त्याचा दाखला, तसेच जन्माचा दाखला, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचा दाखला ज्यावर जन्मतारीख लिहिलेली असेल, हे सर्व कागदपत्र आवश्यक ठरतात.
"अनेक मतदारांचे ओळखपत्र जुने आहेत. काही मतदारांच्या कार्डवरील नावे पुसलेली आहेत किंवा पुसट आहेत. कार्ड फाटलेले सुद्धा असतात. त्यामुळे नागरिकांनी नवीन मतदार कार्ड काढण्यासाठी अर्ज करावे."
- अनिल गावित, उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक निवडणूक विभाग, वर्धा.