प्रश्न विचारायला शिकाल तर विचार प्रक्रियेला गती मिळेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 10:18 PM2017-12-05T22:18:47+5:302017-12-05T22:19:05+5:30
निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा. आयुष्यात नेहमी प्रश्न विचारायला शिका, प्रश्न पडला म्हणजे विचारप्रक्रियेला गती मिळते आणि त्यातूनच प्रश्नांची उकल होते, असे मत आयकेईए फाउंडेशन, नेदरलँडचे सीईओ पर हेगन्स यांनी व्यक्त केले.
लीला पुणावाला फाउंडेशनतर्फे बोरगाव (मेघे) येथील औषधीनिर्माण व संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना रविवारी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. यावेळी पर हेगन्स कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. भारत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारतीय संस्कृतीचा इतिहास समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे. देशातील मुलींचेही समाजाप्रती काही कर्तव्य आहे जे त्यांनी पार पडायला हवेत, असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधतांना दिला.
यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पुणावाला, फिरोज पुणावाला, रोडा मेहता, कारेन हेगन्स, पॅट्रीक आॅबेनो, अल्का भुगूल, सारीका डेहनकर, योगिता मानकर, स्मिता बढिये यांची उपस्थिती होती.
यावेळी नर्सिंग, अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील २३७ गरजु व गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. ही शिष्यवृत्ती टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. मागील वर्षी २७६ विद्यार्थिनीची शिष्यवृत्तीकरिता निवड करण्यात आली होती. मुलींना मार्गदर्शन करताना लीला पुणावाला म्हणाल्या, ज्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली आहे त्या ‘लीला गर्ल्स’ आहेत. त्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या विद्यार्थिनींना इंग्रजी भाषेसह संवाद कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, विविध कला गुणांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. समाजाकडून आपण काही घेतले ते भविष्यात समाजालाच परत करायचे, असेही त्या पुढे म्हणाल्या. फिरोज पुणावाला यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आयरिन डेविड व युनिता कोसे यांनी केले. आभार समृद्धी खराडे यांनी मानले. विद्यार्थिनी, पालकवृंद यावेळी उपस्थित होते. पूनम जैन, स्रेहल कुबडे, चांदणी गोपाल, शिवानी बत्तुलवार, सुरभी मोरस्कर, प्रिया पेठीया, ममता चौबे, मृणाल राऊत, साक्षी पिम्परवर, मोनाली वाळके, नेहा खेडकर, अंजली मंडळ, आम्रपाली रामटेके, भक्ती मुर्दिओ यांनी सहकार्य केले.