डायल ११२ वर केला फेक कॉल तर तुरुंगात जाल, दंडही भरावा लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:36 PM2024-05-17T16:36:23+5:302024-05-17T16:37:38+5:30
रिस्पॉन्स टाइम १० मिनिटांवर : ५,६१९ जणांच्या मदतीला धावले पोलिस
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डायल ११२ या हेल्पलाइनवर कॉल करताच काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळावर पोहचत आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, काही जण फेक कॉल करीत असल्याचे प्रकारही उघडकीस येत असल्याने अशा लोकांवर आता थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. यात दोषी आढळल्यास कारावास व दंडाची शिक्षाही होऊ शकते.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत नियंत्रण कक्षात तब्बल ५,६१९ कॉल्स प्राप्त झाले असून, अवघ्या १० मिनिटांत पोलिस मदतीला धावले आहेत. अडचणीत सापडलेल्या लोकांना तत्काळ मदत मिळावी, यासाठी डायल ११२ ही हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. यावर कॉल येताच काही मिनिटांतच पोलिस पथक घटनास्थळी दाखल होते. अपघातग्रस्तांसाठी ही सेवा देवदूतच ठरत आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यात पथकाला आले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या मदतीलाही है पथक धावत आहे. त्यामुळे मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, काही टवाळखोर गंमत म्हणून कॉल करीत आहेत. अशावेळी मदतीची खरोखरच गरज असलेल्या व्यक्तीचा कॉल प्रतीक्षेत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांची आता खैर नाही.
स्वतंत्र 'वॉर रूम'मधून रात्रंदिवस राहतो 'वाँच'
■ एसपी नुरुल हसन यांच्या देखरेखीत स्वतंत्र वॉर रूममधील आठ ते दहा संगणकाच्या माध्यमातून रात्रंदिवस ही यंत्रणा कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनुने, कॉल पुढे पाठविणारे आठ डिस्पॅचर, अभियंता रुकेश ढोले, सिद्धार्थ बोरकर हे बारीक लक्ष ठेवून आहेत.
२९० ज्येष्ठांच्या तक्रारी
डायल ११२ वर सर्वाधिक घरगुती वादाच्या घटनांमुळे कॉल्स येतात. अशातच सुनेने घरून काढून दिले. मुलगा, सून सांभाळत नाहीत, आदी विविध कारणांतून अशा २९० ज्येष्ठांनी डायल ११२ कडे कॉल करून संरक्षण मागितले.
प्राप्त तक्रारी अन् रिस्पॉन्स टाइमवर एक नजर
महिना प्राप्त कॉल्स रिस्पॉन्स टाइम (मिनिटांत)
जानेवारी १,३९४ ०९.४१
फेब्रुवारी १,३५५ १३.२४
मार्च १,४९९ १०.४९
एप्रिल १,३७१ १०.२१
फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी
डायल ११२ वर फेक कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध एफआ- यआर नोंदविला जातो. त्याला पुढील प्रक्रियेत शिक्षा किंवा दंडही होऊ शकतो. वर्धा जिल्ह्यात असे गुन्हे दाखल केले आहेत. आर्ची ठाण्यासह वर्धा व इतरही ठाण्यात फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
१,६६७ महिलांना देण्यात आले संरक्षण
■ नवरा दारू पिऊन मारहाण करीत आहे. कुटुंबातील अन्य सदस्य शिवीगाळ करीत असल्याच्या अनेक तक्रारी डायल ११२ कडे येतात. अशा जवळपास विविध कारणांच्या मागील चार महिन्यांत १,६६७ महिलांना डायल ११२ ने संरक्षण दिले आहेत.
३१५ अपघातग्रस्तांना मिळाला दिलासा
विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात, अशातच डायल ११२ वर कॉल करून मदत मागितली जाते. मागील चार महिन्यांत डायल ११२ वर प्राप्त झालेल्या ३१५ कॉल्सला तत्काळ प्रतिसाद देत अपघातग्रस्तांना मदत पोहचवून त्यांना दिलासा दिला.
१०.२१
डायल ११२ ही प्रणाली २४ बाय ७ सजग आहे. कॉल प्राप्त होताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचतात. फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. अनेक महत्त्वाचे गुन्हे रोखण्यात या यंत्रणेला यश आले आहे. कुणीही फेक कॉल करू नये. गंभीर घटना घडल्यास तत्काळ संपर्क करा, अवघ्या दहा मिनिटांत पोलिस मदत पोहचेल.
- नुरुल हसन, जिल्हा पोलिस अधीक्षक..