नागपूर जायचेय आठ हजार द्या...चंद्रपूर जायचे असेल तर 12 हजार मोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:00 AM2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:02+5:30

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे.  शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे.

If you want to go to Nagpur, give eight thousand ... If you want to go to Chandrapur, count 12 thousand! | नागपूर जायचेय आठ हजार द्या...चंद्रपूर जायचे असेल तर 12 हजार मोजा !

नागपूर जायचेय आठ हजार द्या...चंद्रपूर जायचे असेल तर 12 हजार मोजा !

Next
ठळक मुद्देखासगी रुग्णवाहिकेकडून लूट : रुग्णांच्या नातेवाइकांकडून आकारले जातेय अधिकचे भाडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या  रुग्णवाहिकेकडून रुग्णांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. नागपूरला रुग्ण घेऊन जायचे असल्यास आठ हजार रुपये, तर चंद्रपूर येथे जायचे असल्यास १२ हजार रुपये अधिकचे भाडे आकारण्यात येत असून रुग्णांच्या नातलगांची एकप्रकारे लूट सुरू आहे. 
मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाइकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला अव्वाच्या सवा पैसे घेत आहेत. इतकेच नव्हेतर रुग्णांना बाहेर जिल्ह्यातील रुग्णालयांत नेण्यासाठीही अधिकचे भाडे आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. एका रुग्णाला वर्ध्याहून नागपूरच्या रुग्णालयात नेण्यासाठी चक्का खासगी रुग्णवाहिकाचालकाने आठ हजार रुपये भाडे आकारले तर हिंगणघाट येथून चंद्रपूरला जाण्यासाठी तब्बल १२ ते १४ हजार रुपये आकारण्यात आल्याने रुग्णांच्या नातलगांची चांगलीच लूट होत आहे. हे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. यामुळे खासगी तसेच कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहे.
 शिवाय घरी उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सेवा उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेच्या शोधात रुग्णांच्या नातेवाइकांना फिरावे लागते. उपप्रादेशिक परिवहन विभागाने दर ठरवून दिलेले असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेच्या चालक मालकांकडून लुटले जात आहे. खासगी रुग्णवाहिका सेवेच्या नावाखाली व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजन सेवा असलेली रुग्णवाहिका मिळणे हे भाग्य असल्याचे समजून रुग्णांचे नातेवाईक रुग्णवाहिका  चालकाचे भाडे आकारणी करेल तेवढे देत आहे. याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष दिल्यास नागरिकांना लुटणाऱ्या खासगी रुग्णवाहिकेचे चालक मालक सुतासारखे सरळ होतील.
 

सेवा भाव गेला कुठे ?
खासगी रुग्णालयांसह विविध संस्था, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या धंद्यात शिरकाव केला आहे. त्यांच्यात कमाईसाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे  या सेवेचे बाजारीकरण झाले आहे. याचा फटका मात्र, आधीच रुग्णांच्या आजारपणामुळे हतबल झालेल्या रुग्णांच्या नातलगांना बसत असून, सेवा भाव गेला कुठे, अशी म्हणण्याची वेळ या संकट काळात आली आहे.

जिल्ह्यात १०७ रुग्णवाहिकांची नोंद
वर्धा जिल्ह्यात एकूण १०७ रुग्णवाहिका आहे या रुग्णवाहिकांची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात शेकडो खासगी रुग्णवाहिका जिल्हाभर धावताना दिसतात. बहुतांश खासगी रुग्णालयाकडे स्वत:ची खासगी रुग्णवाहिका आहे. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका खासगी रुग्णालयात रुग्णांना नेत नाहीत. मात्र, अनेकवेळा गंभीर रुग्णाला खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये नेणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो.  त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेचा चालक वाटेल तेवढे पैसे घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांची लूट करीत आहेत.

अनेक रुग्णवाहिकांची नोंदीकडे पाठ 
रुग्णवाहिका घेतल्यानंतर तिची पासिंग होतानाच रुग्णवाहिका म्हणून आरटीओ  कार्यालयात नोंद होते. मात्र, काही जणांनी आधी व्हॅनसारखी वाहने घेतली आहेत. नंतर पुढे त्यांना रुग्णवाहिका करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यांची वाहन म्हणून नोंदणी असली तर रुग्णवाहिका म्हणून नोंद नाही. अशा अनेक रुग्णवाहिका जिल्ह्यात धावत असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे रुग्णवाहिका असल्याने त्यांना रस्त्यावर तपासलेही जात नाही. याचाच फायदा ते घेत आहे.

बेदारकपणे चालविणे झाले धोक्याचे 
एका खासगी रुग्णवाहिकेच्या चालकाने रुग्णवाहिका बेदारकपणे चालविल्याने रविवारी ठाकरे मार्केट परिसरात रुग्णवाहिका रस्तादुभाजकावरील मातीत फसली. दरम्यान, रुग्णवाहिकेतील कुणालाही इजा झाली नाही.  वास्तविक रुग्णाला सुस्थितीत रुग्णालयात पोहोचविणे रुग्णवाहिका चालकाचे काम असते. करकचून ब्रेक मारणे, खड्ड्यातून वेगात नेणे, अशा प्रकारामुळे रुग्णाला त्रास होतो. मात्र, एखाद्या रुग्णाला दवाखान्यात सोडत असताना दुसऱ्या रुग्णांसाठी फोन आलाच तर पहिल्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचविण्यासाठी वाहनचालकाला घाई सुटते.

 

Web Title: If you want to go to Nagpur, give eight thousand ... If you want to go to Chandrapur, count 12 thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.