पेट्रोल-डिझेल चोरीसह सुविधांकडेही दुर्लक्ष
By admin | Published: July 17, 2017 02:00 AM2017-07-17T02:00:27+5:302017-07-17T02:00:27+5:30
सर्वत्र ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चर्चेत असताना वर्धेतील एकाही पेट्रोलपंपाची तपासणी झाली नाही.
जिल्ह्यात ५० पंप : नागरिकही अधिकारांबाबत अनभिज्ञ
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वत्र ई-पेट्रोल चोरीचा मुद्दा चर्चेत असताना वर्धेतील एकाही पेट्रोलपंपाची तपासणी झाली नाही. शेजारी जिल्ह्यात या तपासणी चमुने कारवाई केली; मात्र यातून वर्धेत नाही. यामुळे शासनाच्या तपासणीत वर्धा जिल्हा नव्हता काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी पंपावरील पेट्रोल चोरीच्या प्रकारासह आवश्यक सुविधांकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे.
जिल्ह्यातील आठ तालुके असून एकूण ५० पेट्रोलपंप आहेत. या पंपावरून पेट्रेल आणि डिझेलची विक्री होते. या विक्री दरम्यान पेट्रोल आणि डिझेल चोरीची अनेक प्रकरणे काही पंपावर घडली आहेत. मात्र कारवाई नसल्याने हा प्रकार सुरूच असल्याचे दिसते. याला नागरिकांत नसलेली जनजागृती हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. वर्धेतील नागरिकांना पंपावर आवश्यक सुविधांबाबत विचारणा केली असता त्यांना मोजक्याच बाबी माहीत असल्याचे दिसून आले. शासनाच्या निर्णयानुसार पेट्रोल पंपावर एकूण ११ सुविधा असणे आवश्यक आहे. या सुविधा कोणत्या या संदर्भात मात्र एकाही नागरिकाला परीपुर्ण माहिती नसल्याचे दिसून आले. पंपावर असलेल्या सुविधा म्हणजे नागरिकांचे अधिकार, या अधिकारांबाबत नागरिक अनभिज्ञ नसल्याचे दिसून आले आहे. आवश्यक सुविधा पुरविण्यात वर्धेतील काही पंप सक्षम असल्याचे दिसून आले तर काहींनी या सुविधा कशाला, असे म्हणत याकडे पाठ केल्याचे दिसून आले आहे.
शासनाने दिलेल्या सुचनेनुसार सर्वच आवश्यक सुविधा पेट्रोल पंपावर देण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र नागरिकांकडूनच कधी या सुविधांबाबत विचारणा होत नाही.
- संजय राजपाल, पंप मालक, वर्धा
पंपावर येणाऱ्या ग्राहकांकरिता आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याची नुकतीच कंपनीच्यावतीने पाहणी झाली आहे. यात त्रूटी असती तर त्यांच्याकडून पंपाला नोटीस बजावण्यात आली असती. तसे झाले नाही.
- सुनील ब्राह्मनकर, पंप मालक, पुलगाव.
सुरक्षेच्या दृष्टीनेही उपाययोजना नाही
वर्धा शहरात एकूण १८ पंप आहे. यातील काही पंपांवचर आवश्यक सुविधा आहे तर काही पंपांवर त्या नसल्याचे दिसून आले आहे. या सोबतच असलेल्या पंपांवर सुरक्षेच्या दृष्टीनेही काही विशेष सुरक्षा नसल्याचे दिसून आले आहे. वर्धेतील काही पंपांवर तर सीसीटीव्हीचाही नियम धाब्यावर बसविला जात असल्याचे दिसते.