साहित्य तपासणीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 10:28 PM2018-06-07T22:28:51+5:302018-06-07T22:28:51+5:30
पावसाळा तोंडावर आला आहे. जिल्ह्यात नदी-नाल्यांकाठी असलेल्या तब्बल ८८ गावांना पुराचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या गावांना वेळप्रसंगी पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळा तोंडावर आला आहे. जिल्ह्यात नदी-नाल्यांकाठी असलेल्या तब्बल ८८ गावांना पुराचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. या गावांना वेळप्रसंगी पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात आल्या. या उपाययोजनेत जिल्ह्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ असलेले साहित्य वर्षभरापासून धुळखात असल्याने ते उपयोगी आहे अथवा नाही याची तपासणी करणे अनिवार्य असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाला तालुक्यांकडून त्याबाबतचा अहवालच प्राप्त नाही, हे विशेष.
जिल्ह्यातून सात नद्या व तीन मोठे नाले वाहत आहेत. या नदी व नाल्यांच्या बाजूने असलेल्या गावांना पुराचा मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे पूर या गावांतील नागरिकांनी अनुभवले आहेत. या गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नुकताच शक्यता असलेली पुरपरिस्थिती निवारण्यासाठी आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी, नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकारी व जिल्ह्यातील आठही तहसीलदारांची उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.
आपत्ती निवारणार्थ असलेले साहित्य
पुरपरिस्थिती निवारण्याकरिता जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या साहित्यात लाईफ जाकेट १६०, मेगा फोन २५, फोल्डींग स्ट्रेचर २४, रोप अॅण्ड रेस्क्यू किट २, सर्च लाईट २५, लाईफ बॉइज १६०, प्रथमोपचार किट २५, शोध व बचाव बॉगल्य १६०, टेंट २४, गम बुट ७५, ड्रम २८०, जिपचे ट्यूब २८० व पोर्टेबल इमरजन्सी लाईट २ असे साहित्य आहे.
यातील किती साहित्या कामांत येणारे आहे याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने मागविण्यात आला असला तरी तालुक्यांनी तो पाठविलेला नाही. बैठकीत दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे तालुका प्रशासन दुर्लक्षच करीत आहे.
पुराचा धोका असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा
धाम नदी काठवर असलेल्या सेलू तालक्यात अशी १५ गावे आहेत. यात येळाकेळी, सुकळी (बाई), कोपरा, चाणकी, खडका, बोरी, मोई, किन्ही, हिंगणी, सेलू, शिरसमुद्र, बाभुळगाव, सुरगाव व वडगाव (कला) या गावांचा समावेश आहे.
देवळी तालुक्यातून वर्धा आणि यशोदा नदी वाहते. यात वर्धा नदीच्या काठावर असलेल्या तांभा, अंदोरी, आंजी, नांदगाव, सावंगी (येंडे) पुनर्वसन, हिवरा (का.), खर्डा, शिरपूर (होरे), गुंजखेडा, पुलगाव, बाभुळगाव (बो.) पुनर्वसन, कांदेगाव पुनर्वसन, कविटगाव, बोपापूर (वाणी), आपटी, निमगव्हान, रोहणी, वाघोली व बऱ्हाणपूर या गावांचा समावेश आहे. याच तालुक्यात यशोदा नदीच्या काठावर असलेल्या बोपापूर (दिघी), सोनेगाव (बाई) व दिघी (बोपापूर) या गावांना पुराचा धोका आहे.
हिंगणघाट तालुक्यातून वाहणाऱ्या वणा नदीच्या तिरावर असलेल्या हिंगणघाट जुनी वस्ती, कान्होली, कात्री व पोटी तर पोथरा नाल्याच्या काठावर असलेल्या पारडी (नगाजी) व कोसुर्ला (लहान), कोसुर्ला (मोठा) या गावांना पुराचा धोका असल्याचे सांगण्यात आले.
समुद्रपूर तालुक्यातून वाहणाऱ्या वणा नदी तिरावरील वाघसूर, कांढळी, कानकाटी, कोरी, सेवा, चाकूर, महागाव, उमरी, कुर्ला. सोबतच धाम नदीच्या काठावरील धानोली, सावंगी (दे.), नांद्रा, आष्टी तर पोथरा व बोर नदी तिरावर असलेल्या डोंगरगाव तसेच लाल नाला प्रकल्पाशेजरी असलेल्या कोराख पवनगाव, आसोला या गावांना पुराचा धोका आहे.
आर्वी तालुक्यातील वर्धा व बाकळी नदीच्या तिरावर असलेले आर्वी शहर, रोहणा, पानवाडी, वडाळा, सायखेडा, शिरपूर, सालफळ, मार्डा, बहाद्दरपूर, जळगाव, परतोडा, देऊरवाडा, टाकरखेडा, माटोडा या गावांना पुराचा धोका दिसते.
आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावरील बेलोरा (बु.), एकोडा, वाघोली, शिरसोली, बेलोरा (खु.), अंतोरा (जुना), गोदावरी, माणिकनगर, बाकळी नदीच्या तिरावर असलेल्या चिस्तूर व तळेगाव (श्या.पंत) तसेच येलाई नाल्यालगतच्या अजीतपूर गाव पुराच्या विळख्यात येण्याची शक्यता वर्तविली आहे.
कारंजा तालुक्यातील काकडा आणि परसोडी या दोन गावांना कार नदीच्या पुराचा धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.