बजाज चौकातील खड्ड्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष
By admin | Published: June 17, 2017 12:47 AM2017-06-17T00:47:35+5:302017-06-17T00:47:35+5:30
पावसाळ्याला सुरूवात झाली तरी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही.
वाहनचालकांना त्रास : पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्याला सुरूवात झाली तरी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली नाही. बजाज चौकातील खड्ड्यांमध्ये पाणी जमा होऊन पहिल्याच पावसात या चौकात ठिकठिकाणी डबके तयार झाले होते. येथून मार्ग काढताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. सदर चौक शहरातील मुख्य वर्दळीचा असल्यामुळे खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करण्याची मागणी सागर युवा सामाजिक संघटनेने केली आहे.
या मागणीचे निवेदन नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. बजाज चौकातून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या भागात रस्त्यावरील डांंबर उखडले असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. अनेकदा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अपघात होतात. रस्त्यावर खोल खड्डे पडले आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. येथील परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्यावतीने तात्काळ खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या चौकातील रस्त्याची दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे. १५ दिवसांच्या आत बजाज चौकातील काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा सागर युवा सामाजिक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या मागणीचे निवेदन न.प. बांधकाम सभापती निलेश किटे यांनी स्वीकारले.
सागर युवा सामाजिक संघटनेचे निवेदन
वर्धा-यवतमाळ मार्गाचे बांधकाम सुरू आहे. सदर काम अत्यंत संथगतीने होत असल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावीत होत आहे. सावंगीपर्यंत एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंवा होतो. सदर बांधकामाला गती देण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी संदीप कुत्तरमारे, उमाकंत काळे, रिजवाण अली, गुंजन मेंढुले, राजू मेंढुले, किशोर शेंडे, प्रशांत कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.