पर्यावरण पुरक विसर्जनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Published: September 13, 2016 12:59 AM2016-09-13T00:59:35+5:302016-09-13T00:59:35+5:30
उच्च न्यायालयाने पर्यावरण पुरक विसर्जनाच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना येथील धाम नदीच्या
कुठल्याही सुविधा नाही : सुरक्षेच्या दृष्टीने केवळ पोलीस प्रशासनाच्या हालचाली
पवनार : उच्च न्यायालयाने पर्यावरण पुरक विसर्जनाच्या सूचना दिल्या आहेत. असे असताना येथील धाम नदीच्या तिरावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. या नदी तिरावर केवळ सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्यावतीने काही उपाय योजना आखण्याकरिता हालचाली होत असल्याचे दिसत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने साफसफाई कर आकारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी महोदयांना आमसभेचा ठराव देऊन रितसर परवानगी मागितली होती; परंतु अद्याप तशी परवानगी मिळाली नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनानेही पुढाकार घेतलेला दिसत नाही. गत वर्षी नदीतून १७ ट्राल्या निर्माल्य व ४० ट्रेलर नदीतील मूर्त्यांचे अवशेष तसेच गाळ काढण्याकरिता ग्रामपंचायतीला अवास्तव खर्च करावा लागला होता. हा खर्च सामान्य फंडातून करण्यात आला होता. आता हा खर्च या फंडातून करू नये असा ठराव ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे हा खर्च कोण करणार यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे.
जिल्हा परिषद प्रशासन ही बाब ग्रामपंचातीवर ढकलून मोकळी होते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तर या प्रकरणावर कुठली चर्चा होताना दिसत नाही. विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे या दृष्टीकोनातून पोलीस प्रशासन मात्र हालचाली करताना दिसत असून संदर्भित त्यांनी अनेक बैठकीतून मौखिक सूचनाही केल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वॉच टॉवर, प्रकाश योजना, ध्वनीक्षेपक, सिक्यूरिटी गार्डस, पट्टीचे पोहणारे, लाईफ जॅकेटस या सर्व बाबींची व्यवस्था पोलीस प्रशासनाने केलेल्या दिसत आहे. धाम नदी तिरावर नंदीखेडा परिसरात घरगुती गणपती व छत्री परिसरात सार्वजनिक गणेशाचे विर्सजन केले जाते. या दोन्ही ठिकाणी सुरक्षाप्रदान करताना पोलीस प्रशासनाची चखांगीलच दमछाक होते. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून छोट्या पुलावरील मार्गाचा अवलंब करावा लागतो.
निर्माल्य नदीत जाऊ नये म्हणून बऱ्याच सामाजिक संस्था पुढकार घेतात; परंतु पीओपीच्या मूर्ती मात्र नदीपात्रातच विसर्जित केल्या जातात. त्यामुळे पाण्यामध्ये अनेक रसायने मिसळून पाणी दूषित होते. त्यामुळे पवनार ग्रा.पं. प्रशासनाने पिओपीच्या मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात करू न देण्याचा ठराव घेतला असला तरी वेळेवर तसा विरोध केल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(वार्ताहर)
लोकांनी जागरूक होणे गरजेचे असून निर्माल्य हे आपल्या घरच्या कुंडीतच टाकले तर त्याचे हिरवळीचे खत तयार होईल, तसेच पीओपीच्या मूर्तीची स्थापना करू नये. त्या मूर्तीचे पाण्यात विघटन होत नाही व त्याचे घातक रसायन पाणी अशूद्ध करते. तेव्हा जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत कडक कारवाई करून ग्रा.पं. प्रशासनाला पुढील वर्षी साफ सफाई कर आकारण्याची परवानगी दिल्यास पर्यावरणपुरक विसर्जनाची संपूर्ण जबाबदारी ग्रा.पं. प्रशासन घेईल.
- अजय गांडोळे, सरपंच, ग्रा.पं. पवनार
गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही पर्यावरण पूरक विसर्जनासाठी पूर्ण उपक्रम राबविले जाईल. निर्माल्य नदीत जाऊ नये म्हणून सामाजिक संघटनेची मदत घेतली जाईल. जि.प. प्रशासनाकडे याकरिता जरी निधीची तरतूद नसली तरी ग्रा.पं. प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने तोडगा काढता येईल. भविष्यात कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जातील.
- महेश डोईजोड, माहिती शिक्षण संवाद सल्लागार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जि.प. वर्धा.