अवैध वीटभट्ट्यांनी वर्धा तालुक्याचा श्वास कोंडला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:12 PM2021-08-24T16:12:59+5:302021-08-24T16:14:40+5:30
Wardha News वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामासाठी महत्त्वाचे साहित्य असलेल्या विटांच्या भट्ट्यांची संख्या वर्धा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत आहे; पण वीटभट्टी मालकांकडून प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमांना हरताळ फासण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. धुरामुळे फळबागांवरही परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. (Illegal brick kilns suffocate Wardha taluka!)
जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, वर्धा, नांदेड महामार्गासाठी अवैध मुरूम चोरी, वाळूचे अवैध उत्खनन कमी झाले असताना अवैध वीट भट्ट्यांनी आता डोके वर काढले आहे. वर्धा तालुक्यात तब्बल ७७ वीटभट्ट्यांच्या आहे. मात्र, यासर्व वीटभट्ट्या विनापरवाना सुरू आहेत. विशेष म्हणजे कारला परिसरात वीटभट्टी चालकांचा त्रास वाढला आहे. समृद्धी महामार्गासाठी झालेल्या मुरूम चोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला. वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गातही दोन कंत्राटदारावर सुमारे २० कोटींचा दंड आकारला.
अवैध वाळूचोरीला राजकीय वरदहस्त असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. हे सारे असताना आता अवैध वीटभट्ट्यांचाही विषय महत्त्वाचा ठरला आहे. खरांगणा गोडे येथील ४ वीटभट्टी चालकांनी अनेक वर्षांपूर्वी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचे नूतनीकरण केले नाही. वीटभट्टीसाठी लागणारी माती शेतातून चोरी केली जाते, तर काही शेतकरी माती विकतात. त्यालाही शासकीय परवानगी आवश्यक असते. प्रदूषणाचे नियमही पाळले जात नाहीत. वीट्टभट्टीवर दारूअड्डा सुरू राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांनाही त्रास होतो.
वीटभट्टी लावण्यासाठी शेतजमीन अकृषक करणे आवश्यक असताना तेही केली जात नाही. वीटभट्टी चालकांची मनमानी वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. महाकाळ परिसरातील वीटभट्टी चालकांनी तर रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे.
खरांगणा येथील ४ वीटभट्ट्या सोडून सर्वच वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. मातीची परवानगी खनिकर्म विभागाकडून दिली जाते. मात्र, अकृषक, अवैध वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात येईल.
-रमेश कोळपे, तहसीलदार, वर्धा