तब्बल 50 हजार वृक्षांची अवैध कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 05:00 AM2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:20+5:30
अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अवैध पद्धतीने तोडलेली झाडांच्या लागडांची कुठलीही परवानगी न घेताच शासकीय सुटीच्या दिवशी वाहतूक केली जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
अमोल सोटे
लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्करांच्या टोळीने वर्षभराच्या काळात अप्पर वर्धा, पाटबंधारे, महसूल, तसेच वनविभागाच्या जागेवरील तब्बल ५० हजारांहून अधिक डेरेदार वृक्षांची अवैध कत्तल केली आहे. इतकेच नव्हे, तर अजूनही छुप्या पद्धतीने डेरेदार वृक्ष तोडले जात आहेत. पण मूग गिळून असलेला स्थानिक वनविभाग साधी चौकशी करण्याचीही तसदी घेत नसल्याने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या लाकूड तस्करांना पाठीशी तर घालत नाही ना अशी शंका वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी उपवनसंरक्षकांनी लक्ष देत वेळीच योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
तालुक्यात सहा आरामशीन
- तालुक्यात सहा आरामशीन आहेत. असे असले तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने लाकडाची कटाई होत असल्याचे दिसून येते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लाकूड कापण्याची परवानगी राहत असताना काही आरामशीन व्यावसायिक रात्रीलाही लाकूड कटाई करीत असल्याने त्याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दुर्लक्षित धोरण ठरते खतपाणी देणारे
- अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे अवैध पद्धतीने तोडलेली झाडांच्या लागडांची कुठलीही परवानगी न घेताच शासकीय सुटीच्या दिवशी वाहतूक केली जात असल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.
तालुक्यात दोन वनपरिक्षेत्र कार्यालय
- तालुक्यात आष्टी व तळेगाव असे दोन वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. या दोन्ही वनक्षेत्रांतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. तालुक्यातील शेतकरी जगावा या हेतूने विविध ठिकाणी सिंचनासाठी कॅनलची व्यवस्था करण्यात आली. पण, याच कॅनलच्या दुतर्फा असलेली डेरेदार बाभूळीचे झाडे तोडण्यात आली असली तरी अप्पर वर्धा आणि पाटबंधारे विभाग चूप आहे.
व्यावसायिकांशी साटेलोटे
- तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्कराचे तालुक्यातीलच काही आरामशीन व्यावसायिकांसोबत साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपवनसंरक्षकांनी आष्टी तालुक्यातील प्रत्येक आरामशीनला भेट देत तेथील लाकूड योग्य मार्गानेच आले काय याची शहानिशा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या भागातील वृक्षांची झाली कत्तल
- तालुक्यात सक्रिय झालेल्या लाकूड तस्करांच्या टोळीने शासकीय सुटीचे दिवस निवडून तालुक्यातील माणिकवाडा, डोंगरगाव (रिठ), अंतोरा, लहान आर्वी, वाघोली, शिरसोली, मोई, मुबारकपूर, पोरगव्हाण पंचाळा, आदी भागातील विविध प्रजातींची डेरेदार वृक्ष अवैध पद्धतीनेच तोडली आहेत.