पोटी पात्रातून वाळूचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:17 PM2018-01-09T22:17:56+5:302018-01-09T22:19:42+5:30

हिंगणघाट तालुक्यातील पोटी येथील वर्धा नदी पात्रातून वाळू माफियांकडून अवैध पद्धतीने उपसा होत आहे.

Illegal lease of sand from the pot | पोटी पात्रातून वाळूचा अवैध उपसा

पोटी पात्रातून वाळूचा अवैध उपसा

Next
ठळक मुद्देवर्धा नदीपात्र धोक्यात : ग्रामस्थांचे जिल्हाधिकाºयांना साकडे

आॅनलाईन लोकमत
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील पोटी येथील वर्धा नदी पात्रातून वाळू माफियांकडून अवैध पद्धतीने उपसा होत आहे. हा प्रकार शासनाच्या महसुलाला चुना लावणारा असून तेथे कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून पोटी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
पोटी गावालगत वर्धा नदीचे मोठे पात्र आहे. येथे रेती साठा होत असल्याने घाट देण्यात आला आहे. वर्धा जिल्हाधिकाºयांनी या घाटाचा लिलावा केला नाही. शिवाय त्यासाठी पोटी ग्रा.पं.नेही ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नसताना येथे रेतीचा उपसा होत आहे. नदी पलीकडील भाग यवतमाळ जिल्ह्यात येत असून तेथील वाऱ्हा  ता. राळेगाव या घाटाचा लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्यामार्फत झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात येत असलेल्या भागात वाळूचा उपसा करणे कंत्राटदाराला क्रमप्राप्त असताना त्याच्याकडून वर्धा हद्दीत येत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. याकरिता नियमांना फाटा देत थेट बोटीच्या सहाय्याने तसेच जेसीबीच्या सहाय्याने रेतीचा उपसा होत आहे.
याबाबत हिंगणघाट येथील तहसीलदारांना व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन योग्य कार्यवाहीची मागणी असून याकडे दुर्लक्ष होत आहे. इतकच नव्हे तर तहसीलदार या घाटमालकाला विशेष सूट देत असल्याचे बोलले जात आहे. या घाटावरील रेतीच्या उपस्याकरिता तहसीलदार आणि महसूल विभागातील काही अधिकाºयांत व्यवहार झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
यामुळे येथे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून जगदीश उपासे, राजेश जाधव, श्रीकांत जगताप, दिलीप महाजन, निलेश रोंघे, विकास यादव, रामचंद्र चव्हाण यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे.
५०० ट्रक रेतीची उचल
यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदाराकडून वर्धा जिल्ह्यातील हद्दीत येत चक्क दिवसाला सुमारे ५०० ट्रक पेक्षा जास्त वाळूची उचल केली जात आहे. हा प्रकार गत २५ ते ३० दिवसांपासून मनमर्जीने सुरू आहे. वाळू उपस्यामुळे नदी पात्रात मोठाले खड्डे तयार झाले असून हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत असल्याने योग्य कार्यवाहीची मागणी ग्रामस्थांची आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे अजब उत्तर
या रेती उपस्याची माहिती देण्याकरिता काही नागरिक जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांना ‘तुम्ही बोटी पकडा’ असे अजब उत्तर देण्यात आले आहे. यामुळे नागरिक अवाक् झाले.
तळेगाव परिसरातही नियम डावलून रेतीचा उपसा
तळेगाव (श्या.पंत.) - गावातून गेलेल्या वर्धा नदीचे पात्र विस्तृत आहे. या पात्रात तिथे तीन ते चार ठिकाणी रेतीघाट आहे. या घाटांचा विशिष्ट कालावधी व काही नियम देत लिलाव करण्यात येतो. यावेळी आखून दिलेले नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे. याची माहिती प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपये महसूल बुडत आहे.
तळेगाव पासून साधारणत: सहा ते सात किलोमीटर अंतरावर भिष्णूर, मुबारकपूर, ईस्लामपूर, नबाबपूर व अजून काही घाट आहेत. रेती माफियांनी या घाटामध्ये रेती उपसा करण्याकरिता आपली यंत्रणा सज्ज केली आहे. रेती उपस्याकरिता पोकलँड व बोटीचा वापर सर्रापपणे होत आहे. या घाटांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. महसूल विभागाचे अधिकारी या घाटधारकांकडून मिळालेल्या बक्षीसाच्या भरोशावर गलेलठ्ठ झाले असून त्यांच्याकडून नावालाही कारवाई होत नाही. त्यामुळे या अवैध रेती उपस्याला कुणाचे निर्बंध नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत स्वत: कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Illegal lease of sand from the pot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.