कन्नमवारग्राम परिसरात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय फोफावला
By admin | Published: March 2, 2017 12:41 AM2017-03-02T00:41:18+5:302017-03-02T00:41:18+5:30
तालुक्यातील कन्नमवारग्राम हे गाव महत्त्वाचे ठिकाण आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या जवळपास आहे.
पोलीस अधीक्षकाकडे तक्रार : कडक अंमलबजावणीची मागणी
कारंजा(घा.) : तालुक्यातील कन्नमवारग्राम हे गाव महत्त्वाचे ठिकाण आहे. या गावाची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या जवळपास आहे. या जंगलव्याप्त गावाचा परिसरातील १० ते १२ गावांसोबत संपर्क येतो. येथे सध्या अवैध दारूविक्रीचा धंदा फोफावला आहे. त्यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत येथील ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. या निवेदनातून दारूविक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. या गावात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र काही दारूविक्रेते येथे दारूचा गाळप करतात. तर देशी व विदेशी दारूची लगतच्या जिल्ह्यातून तस्करी केली जाते. जंगलमार्गे दारूची वाहतूक करुन चा माल अन्यत्र पोहचविला जातो. हा प्रकार गत दहा वर्षांपासून सुरू आहे.
या गावात ठोक दराने दारूचा पुरवठा होतो अशी माहिती आहे. कन्नमवारग्राम येथील हातभट्टीची दारू प्रसिद्ध आहे. यावरुन येथील दारू व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना करता येईल. या विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश नाही. या दुर्गम भागात कोणतीच कारवाई होत नसल्याने दारूविकेत्यांचे चांगलेच फावते. या अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे. याला वेळीच प्रतिबंध केला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
गावातील किराणा दुकानातून दिवसाला १ ते २ क्विंटल गुळाची विक्री केल्या जाते. या गुळाचा वापर कशासाठी होतो, याची चौकशी झाली पाहिजे. या दारूविक्रीमुळे गावात तंटे वाढले आहे. युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे.
गावात दारूविक्री जोमात सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र सुस्त आहे. गुरूवारी येथे बाजार असतो. त्यादिवशी बसस्टॉपपासून ते बाजारापर्यंत खुलेआम दारूविक्री सुरू असते. बाजारात खरेदीकरिता आलेल्या महिलांचा याचा त्रास होतो. गावातील युवा पिढी दारू गाळप करण्याच्या व्यवसायाकडे वळत आहे. दारूविक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.(शहर प्रतिनिधी)